

कॅनबेरा : मेलबर्नस्थित स्टार्टअप Cortical Labs यांनी तयार केलेला नवीन प्रकारचा संगणक, जो पारंपरिक सिलिकॉन हार्डवेअर आणि मानवी न्यूरॉन्स (मेंदूच्या पेशी) यांचा संगम आहे, आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. CL1 असे या संगणकाचे नाव असून, तो आता अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या मते, हा ‘जगातील पहिला कोड-डिप्लॉय होणारा जैविक संगणक’ आहे.
शू-बॉक्स एवढ्या आकाराचा हा संगणक रोग मॉडेलिंग आणि औषध संशोधनासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे Cortical Labs चे प्रतिनिधी सांगतात. CL1 मध्ये एक पोषकतत्त्वयुक्त द्रव ठेवले जाते, जो मानवी न्यूरॉन्सना पोषण देतो. हे न्यूरॉन्स एका सिलिकॉन चिपवर वाढतात आणि त्या चिपद्वारे विद्युत संकेत न्यूरॉन्सपर्यंत पोहोचवले जातात व तिथून पुन्हा परत मिळवले जातात. हे संकेत न्यूरॉन्सना विशिष्ट वर्तन शिकवण्यासाठी वापरले जातात.
याआधी DishBrain नावाच्या प्रोटोटाइपने Pong हा व्हिडीओ गेम खेळायला शिकले होते, आणि त्याच तंत्रज्ञानाचा वापर CL1 मध्ये करण्यात आला आहे. Cortical Labs चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी ब्रेट कगन यांनी सांगितले की, ‘ CL1 मध्ये एक परफ्युजन सर्किट आहे, जे पेशींना जिवंत ठेवण्यासाठी जीवनसाठा प्रणालीसारखे काम करते, यात तापमान नियंत्रण, वायू मिश्रण, आणि अपशिष्ट पदार्थांचे शुद्धीकरण यंत्रणा आहेत.’ या संगणकाला चालण्यासाठी फक्त काही वॅटस् ऊर्जा लागते आणि त्यातील न्यूरॉन्स सहा महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात, असे कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे.
सध्या संशोधक असे मॉडेल विकसित करण्यावर काम करत आहेत जे मेंदूतील विविध पेशींचे कार्य अत्यल्प पेशींच्या साहाय्याने अचूकपणे दर्शवू शकेल. CL1 सारखी उपकरणे संशोधकांना मेंदूसंबंधी आजारांवर उपचार शोधण्यासाठी मदत करू शकतात. ‘मनोविकार व न्यूरोलॉजिकल आजारांसाठी चाचणीमध्ये येणारी बहुतेक औषधे अपयशी ठरतात. कारण, मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये खूप सूक्ष्म बाबी असतात; परंतु या प्रकारच्या जैव संगणकांमध्ये त्या सूक्ष्मता थेट दिसून येतात,’ असे कगन यांनी नमूद केले.
मात्र, या तंत्रज्ञानात मानवी न्यूरॉन्सचा वापर असल्यामुळे काही वैज्ञानिकांनी ‘कृत्रिम जैविक बुद्धिमत्ता’ विकसित करण्याबाबत नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. DishBrain आणि CL1 हे मानवी मेंदूपेक्षा कमी जटिल असले, तरीही अशा तंत्रज्ञानामुळे चेतना, वेदना यांसारख्या संकल्पनांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात ऑस्ट्रेलियातील Murdoch Children' s Research Institute मधील स्टेम सेल संशोधक सिल्विया व्हेलास्को म्हणतात, ‘सध्या तरी हे एक निराधार भीती वाटते. मेंदूसंबंधी गंभीर आजार बरे करण्याची संधी असताना ही प्रणाली वापरणे नाकारणे चुकीचे ठरेल. पण, या मॉडेल्सच्या वापरामुळे भविष्यात निर्माण होणार्या नैतिक प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे.’