पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमधील (Los Angeles wildfire) जंगलाला लागलेल्या भीषण आगीने मोठी हानी झाली आहे. या आगीत आतापर्यंत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर लॉस एंजेलिस काउंटीमधील २ हजारहून घरे, मोठ्या इमारती जळून खाक झाल्या आहेत. या प्रदेशातील ही आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आगीची घटना आहे.
लॉस एंजेलिस काउंटी अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अल्ताडेना येथील तीन इमारतींमध्ये ५ मृतदेह सापडले. पॅलिसेड्स येथील आगीत १ हजारहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत आणि ईटन येथील आगीत सुमारे १ इमारतींचे नुकसान झाले झाल्याचा अंदाज आहे.
लॉस एंजेलिसची हॉलिवूड सेलिब्रिटींचे (Hollywood Hills) घर म्हणून ओळख आहे. गंभीर बाब म्हणजे लॉस एंजेलिस परिसरातील भीषण आगीत बिली क्रिस्टल आणि पॅरिस हिल्टन या सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाली आहेत. हॉलिवूड सेलिब्रिटींची घरे असलेल्या या शहरात आणि आजूबाजूला ६ वेगवेगळ्या आगी लागल्या आहेत. येथील १ हजारहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत.
निक्सन आणि कॅसिनो चित्रपटात काम केलेले अभिनेते जेम्स वुड्स (James Woods) यांना सीएनएनशी बोलताना पॅसिफिक पॅलिसेड्समधील त्यांच्या घराचे आगीमुळे झालेले नुकसान पाहून अश्रू अनावर झाले. "एक दिवस तुम्ही पूलमध्ये पोहत असता आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही नष्ट झालेले दिसते," असे सांगत वुड्स भावूक झाले.
अभिनेता बिली क्रिस्टल (Billy Crystal) यांचेही ४६ वर्षांपासूनचे राहते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, पॅसिफिक पॅलिसेड्स येथील त्यांच्या घराच्या नुकसानीमुळे ते आणि त्यांची पत्नी जेनिस हिला खूप दु:ख झाले आहे. हे दाम्पत्य १९७९ पासून या घरात राहत होते. क्रिस्टल हे When Harry Met Sally आणि City Slickers मधील भूमिकांसाठी ओळखले जातात. "आमची मुले आणि नातवंडे ज्या घरात मोठी झालीत ते घर नष्ट होताना खूप दुःख झाले.'' असेही पुढे त्यांनी म्हटले आहे.
या भागात जेनिफर ॲनिस्टन, ब्रॅडली कूपर, टॉम हँक्स, रीझ विदरस्पून, अॅडम सँडलर आणि मायकेल कीटन यांचीही पॅसिफिक पॅलिसेड्समध्ये घरे आहेत.
हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका पॅरिस हिल्टन (Paris Hilton) हिचेही कॅलिफोर्नियातील मालिबू येथील घर आगीत जळून खाक झाले आहे. ''मला जे दुःख झाले हे शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे आहे." अशा भावना पॅरिस हिल्टन हिने इंस्टाग्रामवर व्यक्त केल्या आहेत.
येथील आगीमुळे अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे घरे सोडली आहेत. यात अभिनेता मार्क हॅमिल आणि यूजीनी लेव्ही यांचा समावेश आहे.