Bill Gates AI warning  File Photo
आंतरराष्ट्रीय

Bill Gates AI warning : 'AI'बाबत बिल गेट्स यांचं मोठं विधान; "माणसांसाठी ४०% नोकऱ्या राखीव ठेवा, अन्यथा..."

AIमध्‍ये विविध क्षेत्रांतील मानवी श्रमाची जागा घेण्याची क्षमता

पुढारी वृत्तसेवा

Bill Gates AI warning : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेला सोपे आणि जलद काम करणारे तंत्रज्ञान मानले जाते.मात्र, मागील काही महिन्‍यामंध्‍ये याच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरातील दिग्गज टेक तज्ज्ञ आणि बिझनेस लीडर्स चिंता व्यक्त करत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी AI च्या भविष्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. AI आणि रोबोट्स जसे अधिक सक्षम होतील, तसतसे समाजात काही विशिष्ट कामे व नोकऱ्या केवळ माणसांसाठीच सुरक्षित ठेवाव्या लागतील, असे मत त्यांनी मांडले आहे. त्यांनी या संकल्पनेला 'ह्युमन रिझर्व्ह' असे नाव दिले आहे.

AIमध्‍ये विविध क्षेत्रांतील मानवी श्रमाची जागा घेण्याची क्षमता

'रॉयटर्स'ला दिलेल्या मुलाखतीत गेट्स म्हणाले की, सध्याच्या एकूण नोकऱ्यांपैकी सुमारे ४० टक्के कामे माणसांसाठी राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. AI केवळ काही साधी किंवा नेहमीची कामे ऑटोमेट करणार नाही, तर विविध क्षेत्रांतील मानवी श्रमाची जागा घेण्याची क्षमता त्यात आहे. याच कारणामुळे येत्या काळात रोजगाराचा मुद्दा अधिक गंभीर बनू शकतो.

भारतासारख्या देशासाठी अधिक महत्त्‍वपूर्ण ठरू

AI बाबत सरकारे, कंपन्या आणि समाजाने आत्तापासूनच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असा इशाराही बिल गेटस यांनी दिला आहे. त्यांचा हा इशारा भारतासारख्या देशासाठी अधिक महत्त्‍वपूर्ण ठरू शकतो, जिथे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात आधीपासूनच आरक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, गेट्स यांची 'ह्युमन रिझर्व्ह' संकल्पना AI मुळे माणसांच्या हातातून जाणारा रोजगार सुरक्षित ठेवणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे.

केवळ २४% लोकांनाच नवीन नोकऱ्यांची आशा

AI मुळे रोजगारावर होणाऱ्या परिणामांविषयी चिंता व्यक्त करणारे बिल गेट्स हे एकमेव तंत्रज्ञान तज्ज्ञ नाहीत. ॲन्थ्रॉपिकचे (Anthropic) सीईओ दारिओ अमोदेई यांनीही याआधी इशारा दिला आहे. AI एकाच वेळी अनेक क्षेत्रांतील मानवी कामांवर प्रभाव पाडू शकत असल्याने लेबर मार्केटमध्ये मोठे आणि कठीण बदल घडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (WEF) जानेवारी २०२६ च्या आकडेवारीनुसार, ५४ टक्के बिझनेस लीडर्सना वाटते की AI मुळे त्यांच्या कंपन्यांमधील नोकऱ्या कमी होऊ शकतात. याउलट, AI मुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा केवळ २४ टक्के लोकांना आहे.

धोका केवळ बेरोजगारीपुरता मर्यादित नाही

AI चा धोका हा केवळ रोजगारापुरता मर्यादित नाही. नोकरी माणसाला उत्पन्नासोबतच एक ओळख, उद्देश आणि समाजाशी जोडले राहण्याचे साधन देते. जर मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गमावल्या गेल्या, तर त्याचा थेट परिणाम कुटुंबे, शहरे, राजकारण आणि सामाजिक व्यवस्थेवर होईल.याच पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी AI वर नियंत्रण ठेवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय देखरेख संस्थेची स्थापना करण्याची संकल्पना मांडली आहे. यासाठी अणुवस्त्रांवर नियंत्रण ठेवणारे नियम, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण नियम आणि जागतिक पर्यावरण करारांमधून धडे घेतले जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT