आंतरराष्ट्रीय

Bilawal Bhutto Marriage Rumors : युरोपच्या राजकुमारीशी लग्नबंधनात अडकणार बिलावल भुट्टो? PPP ने सांगितले वस्‍तुस्‍थिती

सोशल मीडियावर सुरू असलेल्या जोरदार चर्चेला अखेर पूर्णविराम

पुढारी वृत्तसेवा

Bilawal Bhutto marriage rumors : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो-जरदारी यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या जोरदार चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बिलावल भुट्टो हे एका युरोपियन शाही घराण्याचे जावई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या; मात्र PPP ने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.कराचीचे महापौर आणि PPP चे वरिष्ठ नेते मुर्तझा वहाब यांनी बिलावल भुट्टो यांच्या साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या सर्व अफ़वा पूर्णपणे चुकीच्या आणि पायाहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

पार्टीने फेटाळल्या अफ़वा

मुर्तझा वहाब यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत यावर स्पष्टीकरण दिले. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली जरदारी यांचे ३८ वर्षीय पुत्र बिलावल हे एका युरोपियन राजघराण्यात लग्न करणार असल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर वहाब यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. अध्यक्ष जरदारी हे आपल्या मुलाच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आणि तारीख ठरवण्यासाठी स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया दरम्यान असलेल्या 'लिकटेंस्टाइन' या छोट्या देशाच्या दौऱ्यावर गेल्याचा दावा सोशल मीडियावर वेगाने पसरणाऱ्या पोस्ट्समध्ये करण्यात आला होता.

ऑस्ट्रियन राजघराण्याशी जोडले गेले नाव

काही माध्यमांनी एक पाऊल पुढे टाकत बिलावल यांची होणारी पत्नी ऑस्ट्रियाची २६ वर्षीय माजी आर्चडचेस 'ग्लोरिया वोन हॅब्सबर्ग' असल्याचे म्हटले होते. ग्लोरिया या ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक कार्ल आणि फ्रान्सिस्का वोन थिसेन-बोर्नेमिझा यांच्या कन्या असून हॅब्सबर्ग-लोरेन घराण्याशी संबंधित आहेत. त्या ऑस्ट्रियाचे अंतिम सम्राट आणि हंगेरीचे राजे कार्ल प्रथम यांच्या पणती आहेत.

पाकिस्‍तानमधील माध्‍यमांचा दावा

पाकिस्तानमधील 'डेली औसाफ' या उर्दू वृत्तपत्राने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने लग्नाची तयारी सुरू असल्याचे वृत्त दिले होते. तसेच अध्यक्ष जरदारी याच कारणासाठी युरोपच्या खाजगी दौऱ्यावर असल्याचेही त्यात म्हटले होते. मात्र, नंतर हे वृत्त संकेतस्थळावरून हटवण्यात आले.

अध्यक्ष जरदारी यांच्या युरोप दौऱ्यामुळे चर्चांना उधाण

२७ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनाने 'X' वर एक पोस्ट करत अध्यक्ष जरदारी हे वैयक्तिक दौऱ्यावर परदेशात गेल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर या अफ़वांना अधिक बळ मिळाले. तथापि, या दौऱ्याच्या हेतूबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. सध्या या संपूर्ण प्रकरणावर खुद्द बिलावल भुट्टो किंवा त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT