Bangladesh quota protests
बांगलादेशात आंदोलनाला हिंसक वळण, १०५ जणांचा मृत्यू file photo
आंतरराष्ट्रीय

Bangladesh quota protests | बांगलादेशात हिंसाचार, आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन अधिक हिंसक होत आहे. आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देशभरात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. देशातील अशांतता रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत, त्यानंतर शुक्रवारी सरकारने संचारबंदी लागू केली असून लष्कराला तैनात केले आहे.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्रणालीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये सुमारे १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन मोठे आव्हान बनले आहे. शेख हसीना यांचे प्रेस सचिव नईमुल इस्लाम खान यांनी एएफपीला सांगितले की, "सरकारने कर्फ्यू लागू करण्याचा आणि अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे."

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली निदर्शने या आठवड्यात तीव्र झाल्याने सुमारे २४५ भारतीय नागरिक शुक्रवारी मायदेशी परतले.

SCROLL FOR NEXT