Bangladesh violence
बांगलादेशातील हिसांचारात मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले करण्यात आले.  Creative Commons
आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात हिंदूविरोधी हिंसाचाराच्या २००वर घटना, अनेक विस्थापित

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचाराची मोठी झळ तेथील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजाला बसली आहे. ५ ऑगस्टपासून आतापर्यंत हिंदूविरोधी हिंसाचाराच्या २०५ घटनांची नोंद झाली आहे, तर ५ हिंदूंची हत्या झालेली आहे. शिवाय अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

या हिंसाचारविरोधात बांगलादेश हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन युनिटी काऊन्सिल, बांगलादेश पूजा उजापन परिषद या संघटना अंतरिम सरकारचे प्रमुख मोहमद युनुस यांची भेट घेणार आहेत. आरक्षण विरोधात विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर ५ ऑगस्टला तत्कालिन पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देऊन भारतात आश्रय घेतला. त्यानंतरही बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात तेथील अल्पसंख्याक समुदायला लक्ष करण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनुस यांना शुभेच्छा देताना हिंदूच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगितले होते.

बांगलादेश हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन युनिटी काऊन्सिलचे अध्यक्ष डॉ. नीम चंद्र भौमिक म्हणाले, "मालमत्तांवर हल्ले करणे, धमक्या देणे अशा तक्रारी ५२ जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या आहेत. ५ ऑगस्टपासून आतापर्यंत अशा २०५ घटनांची नोंद आम्ही केली आहे."

तर बांगलादेश पूजा उजापन परिषदेचे अध्यक्ष बासुदेव धर यांनी या हिंसाचारात ५ हिंदूंची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदाय प्रामुख्याने शेख हसिना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थक आहेत, त्यामुळे हे हल्ले झाले, तर काही घटना या लुटमार करण्याच्या उद्देशाने झाल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT