Bangladesh anti-Hindu violence :
ढाका : बांगलादेशातील उत्तर रंगपूर जिल्ह्यातील कुर्शा भागात ७५ वर्षीय स्वातंत्र्यसेनानी आणि त्यांच्या पत्नीची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या वृद्ध दाम्पत्याचे दोन्ही मुलगे पोलीस अधिकारी असूनही, या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा कोणाला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाने हत्येचा संबंध युनूस राजवट आणि स्वातंत्र्यविरोधी इस्लामी गट जमात-ए-इस्लामीला दिलेल्या पाठिंब्याशी जोडला आहे.
बांगलादेश संवाद संस्थेने (बीएसएस) दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या उत्तर रंगपूर जिल्ह्यातील कुर्शा भागातील उत्तर रहिमापूर भागात ७५ वर्षीय जोगेश चंद्र रॉय आणि त्यांची पत्नी सुबोर्ना रॉय राहत होते. रविवारी (दि. ७) सकाळी शेजारी त्यांच्या घरी गेले. दाम्पत्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी मुख्य दरवाज्यावरून शिडी लावून घरात प्रवेश केला. आतमध्ये सुवर्णा रॉय यांचा मृतदेह स्वयंपाकघरात आणि जोगेश चंद्र रॉय यांचा मृतदेह डायनिंग रूममध्ये आढळला. दोघांचेही गळे चिरलेले होते. तारागंज पोलीस स्टेशनचे अधिकारी (स्थानक प्रभारींसह) आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक पथक आणि गुप्तहेर (डिटेक्टिव्ह) पथक तैनात करण्यात आले असून शवविच्छेदनाचे आदेश देण्यात आले आहेत, असे द डेली स्टारने वृत्त दिले आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
जोगेश चंद्र रॉय हे १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे अनुभवी होते आणि नंतर त्यांनी सरकारी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम केले. ते २०१७ मध्ये निवृत्त झाले. हे दाम्पत्य गावात एकटेच राहत होते. त्यांचे दोन मुलगे, शोभेन चंद्र रॉय आणि राजेश खन्ना चंद्र रॉय बांगलादेश पोलीस दलाचे अधिकारी आहेत. दोघेही अनुक्रमे जॉयपूरहाट आणि ढाका येथे कार्यरत आहेत.
या दुहेरी हत्या प्रकरणी अधिकार्यांनी अद्याप कोणत्याही संशयिताची माहिती जाहीर केलेली नाही. अधिकाऱ्यांनी कोणताही संशयित प्रोफाइल जाहीर केलेला नाही किंवा दरोडा, सांप्रदायिक हेतू किंवा लक्ष्यित राजकीय हिंसाचार विचारात घेतला जात आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. या घटनेने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानींच्या नेत्यांनी तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे, तर काही जणांनी आरोपींना त्वरित पकडले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेख हसीना यांना ऑगस्ट २०२४ मध्ये पदच्युत केल्यापासून बांगलादेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे, व्यवसाय आणि मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेने ४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत अल्पसंख्याकांविरुद्ध जातीय हिंसाचाराच्या सुमारे २,००० घटनांची नोंद केली आहे. यामध्ये ९ हिंदूंचा मृत्यू आणि ६९ प्रार्थनास्थळांवर हल्ले यांचा समावेश आहे. या हल्ल्यांच्या घटना वाढल्या असतानाच, युनूस यांनी मात्र हिंदूविरोधी हिंसाचाराचे अहवाल 'अतिशयोक्त' असल्याचे म्हटले आहे.
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिस दलाला क्रूरपणे लक्ष्य करण्यात आले होते. १२ हून अधिक पोलिसांची हत्या करण्यात आली. तेव्हापासून अनेक पोलिस पुन्हा कर्तव्यावर परतले नाहीत. अल्पसंख्याक अधिकार संघटनांनी म्हटलं आहे की, ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशमध्ये हजारो जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, अवामी लीग नेते मोहम्मद अली अराफत यांनी म्हटलं आहे की, दुहेरी हत्याकांडाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यांना अधोरेखित केले आहे. "मुहम्मद युनूस यांच्या राजवटीत, स्वातंत्र्यविरोधी इस्लामी गट जमात-ए-इस्लामीच्या पाठिंब्याने, असे हल्ले आणि हत्या अधिक वारंवार होत आहेत. बांगलादेशातील स्वातंत्र्यसैनिकांना युनूस यांच्या राजवटीत मारले जात आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.