Bangladesh Plane crash
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका सोमवारी एका भीषण विमान अपघाताने हादरली. हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान येथील एका शाळेच्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान २७ जणांचा मृत्यू झाला असून, १६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
चीनमध्ये तयार झालेले हे एफ-७ विमान ढाक्याच्या उत्तरा भागातील 'माईलस्टोन स्कूल अँड कॉलेज'च्या इमारतीवर कोसळले. ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा शाळेत वर्ग सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अपघातानंतर घटनास्थळावरून आगीचे आणि काळ्या धुराचे लोट उठले. बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले. यापैकी ४८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बांगलादेशच्या लष्करी जनसंपर्क विभागाने (ISPR) दिलेल्या माहितीनुसार, "विमानाचे पायलट, फ्लाईट लेफ्टनंट मोहम्मद तौकीर इस्लाम यांनी मोठे नुकसान टाळण्यासाठी विमान दाट लोकवस्तीच्या भागातून कमी लोकवस्तीच्या ठिकाणी नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दुर्दैवाने, विमान शाळेच्या दोन मजली इमारतीवर कोसळले." हवाई दलाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून जखमींना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी या घटनेला "राष्ट्रासाठी अत्यंत दुःखाचा क्षण" म्हटले आहे. त्यांनी अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे आणि पीडितांना सर्व प्रकारची मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
या वर्षात चीन-निर्मित एफ-७ विमान कोसळण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. गेल्या महिन्यात म्यानमार हवाई दलाचे एक एफ-७ लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे चीनमध्ये तयार होणाऱ्या संरक्षण उपकरणांच्या दर्जा आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.