Dhaka school jet crash file photo
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Plane Crash : ढाकामध्ये लढाऊ विमान शाळेवर कोसळलं

बांगलादेश एअर फोर्सचं लढाऊ विमान ढाकामधील शाळेवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.

मोहन कारंडे

ढाका : बांगलादेश एअर फोर्सचं एक प्रशिक्षणार्थी लढाऊ विमान आज (दि. २१) ढाकामधील शाळेवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

ही घटना ढाकाच्या उत्तरामधील माईलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीत घडली. चीनमध्ये तयार करण्यात आलेले F-7 प्रकारातील हे विमान प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा शाळेच्या आवारात विद्यार्थी उपस्थित होते. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातानंतर इमारतीला मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

या दुर्घटनेत सुमारे १३ जण जखमी झाले आहेत. बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयाने एका निवेदनात हे विमान हवाई दलाचे असल्याचे सांगितले. मात्र, अपघाताचे कारण आणि पायलटने विमानातून उडी मारली होती की नाही, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, समोर आलेल्या फुटेजमध्ये शाळेच्या इमारतीतून धूर निघताना दिसत आहे. बचाव पथके परिसराला सुरक्षित करण्याचे आणि जखमींना रुग्णालयात हलवण्याचे काम करत आहेत. अधिकाऱ्यांनी या अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT