Balochistan leader statement
पुढारी ऑनलाईन डेस्क : बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग कधीच नव्हता आणि कधीच होणार नाही, असा ठाम दावा बलुच नॅशनल मूव्हमेंटचे (BNM) माहिती सचिव काझी दाद मोहम्मद रेहान यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत केला आहे. त्यांनी ‘ऑपरेशन बाम’च्या पार्श्वभूमीवर हा गौप्यस्फोट केला आहे.
‘ऑपरेशन बाम’ हे बलुच लिबरेशन फ्रंट (BLF) या सशस्त्र संघटनेने सुरू केलेले एक समन्वयित लष्करी अभियान आहे.
मंगळवारी रात्रीपासून सुरु झालेल्या या कारवाईत पांजगूर, सुराब, केच आणि खराण या बलुचिस्तानमधील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी आणि प्रशासकीय ठिकाणांवर एकत्रितपणे 17 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे कम्युनिकेशन नेटवर्क्स, प्रशासनिक इमारती आणि लष्करी चौक्यांचे मोठे नुकसान झाले.
बीएनएमचे रेहान यांनी सांगितले की, “आम्ही पहिली संघटना आहोत जिने पाकिस्तानच्या संसदीय प्रक्रियेला स्पष्ट विरोध केला आहे. आमचा लढा कोणत्याही प्रकारच्या स्वायत्ततेसाठी नाही, तर पूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, बलुच जनता आता आपला निर्णय स्वतः घेण्यास सज्ज आहे.
रेहान यांनी बलुचिस्तानचा पाकिस्तानमध्ये 1948 मध्ये जबरदस्तीने समावेश झाल्याची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “तेव्हापासूनच आमचा संघर्ष सुरु झाला आहे. पूर्वी हा लढा जमात प्रमुखांच्या नेतृत्वाखाली होता, परंतु आजचा लढा सामान्य बलुच जनतेचा आहे.”
आजची बलुच लढवय्ये पिढी केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर आधुनिक गनिमी युद्ध तंत्रज्ञान आणि रणनीतीचा वापर करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
रेहान यांनी पाकिस्तानच्या चीनसोबतच्या आर्थिक सहकार्य उपक्रमावरही (CPEC) जोरदार टीका केली. “बलुचिस्तानच्या संसाधनांवर कोट्यवधींचा खर्च होतो आहे, परंतु स्थानिक बलुच जनता अजूनही दारिद्र्यात जगत आहे. हे प्रकल्प केवळ पंजाब किंवा पाकिस्तानच्या इतर भागांसाठी फायदेशीर ठरत आहेत,” असे ते म्हणाले.
बलुचिस्तानचा लढा न्याय्य - जागतिक समुदायाला आवाहन
रेहान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला साद घालत सांगितले की, “बलुचिस्तानचा लढा न्याय्य आणि अपरिहार्य आहे. ‘ऑपरेशन बाम’ ही केवळ सुरुवात आहे. आमची दिशा स्पष्ट आहे – स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भर बलुचिस्तान.”
BLF चे प्रवक्ते मेजर ग्वाहराम बलुच यांनी म्हटले की, या हल्ल्यांमुळे आम्ही आमची क्षमता दाखवली आहे – कोस्टल भागांपासून ते कोह-ए-सुलेमान पर्वतरांगांपर्यंत एकाच वेळी हल्ले करणे ही आमची रणनीती आहे.
पाकिस्तानकडून शोधमोहीम
या हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी संबंधित भागांमध्ये शोधमोहीम सुरु केली असून, केच आणि पांजगूरमध्ये संचार सेवा खंडित करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सरकारकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.