इवल्याशा हरणात आली बाहुबलीची ताकद, घेतला महाकाय गेंड्याशी पंगा, शेवटच्या प्रसंगाने सगळे हैराण!  File Photo
आंतरराष्ट्रीय

इवल्याशा हरणात आली बाहुबलीची ताकद, घेतला महाकाय गेंड्याशी पंगा, शेवटच्या प्रसंगाने सगळे हैराण!

विशाल गेंड्याशी भिडला चिमुकला हरीण, पुढे जे घडलं ते पाहून लोक थक्क झाले…

पुढारी वृत्तसेवा

baby deer fights giant rhino last scene stuns the internet

पुढारी ऑनलाईन

एका चिमुकल्या हरणाने तब्बल 1.7 टन वजनाच्या प्रचंड गेंड्याला थेट आव्हान दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतक्या छोट्या हरणात एवढी हिंमत आली कुठून, असा प्रश्न नेटकरी आश्चर्याने आणि थोड्या गंमतीने विचारत आहेत.

पोलंडमधील ब्रोकलॉ (Wroclaw) प्राणीसंग्रहालयात हा धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की एक छोटंसं हरीण आपल्या शिंगांनी गेंड्याला धडक देतं आणि नंतर स्वतःपेक्षा कितीतरी पटीने मोठ्या गेंड्याच्या मागे धाव घेतं. या गेंड्याचं नाव ‘मारुस्का’ असल्याचं सांगण्यात आलं आहे. आकारात जमीन-आसमानाचा फरक असतानाही हरणाचा हा निर्भय अंदाज तिथे उपस्थित असलेल्या लोकांना अक्षरशः थक्क करून सोडतो.

इतक्या छोट्या हरणात एवढी हिंमत आली कुठून?

प्राणीसंग्रहालय प्रशासनाने या असामान्य वर्तनामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. अधिकाऱ्यांच्या मते, त्या हरणाचे हार्मोन्स सध्या अत्यंत सक्रिय अवस्थेत होते. त्याची मादी जोडीदार ‘हीट’ अवस्थेत होती आणि नर हरणामध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त होते. त्यामुळेच तो आपली ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत होता.

प्राणीसंग्रहालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं की, त्याला आपली ताकद दाखवायची होती आणि ‘बॉस कोण आहे’ हे सिद्ध करायचं होतं, समोरचा प्राणी 1.7 टन वजनाचा असला तरीही. अधिकाऱ्यांनी गंमतीशीर शैलीत असंही म्हटलं की, इतक्या छोट्या शरीरात असा योद्धा दडलेला असेल, असं कुणाला वाटलं होतं?

हे हरण ‘रीव्ह्ज मंटजॅक’ (Reeves’s Muntjac) या प्रजातीचं आहे. या प्रजातीला ‘भुंकणारे हरण’ असेही म्हणतात, कारण हे हरण कुत्र्यासारखा आवाज काढते. ही प्रजाती मूळची दक्षिण-पूर्व चीन आणि तैवान येथील असून, बर्फाळ जंगलांपासून ते उपोष्णकटिबंधीय भागांपर्यंत विविध वातावरणात सहज राहू शकते.

प्राण्यांचे देखभालकर्ता माचेय ओकुपनिक यांच्या मते, हा संघर्ष जरी असामान्य वाटत असला तरी सामान्यतः हरणे आणि गेंडे एकमेकांसोबत शांततेने राहतात. त्यांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयात आणि जंगलातही हे प्राणी अनेकदा एकाच परिसरात आढळतात, मात्र सहसा एकमेकांपासून अंतर राखून असतात. दोन्ही प्रजाती आपापल्या क्षेत्राची सीमा वेगवेगळ्या पद्धतीने ठरवतात, त्यामुळे अशा प्रकारची थेट भिडंत फारच क्वचित पाहायला मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT