Khalistani terror group restrictions
लंडन : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली आहे. या संघटनेवरील आर्थिक व्यव्हारावर ब्रिटनने निर्बंध लादले आहेत. अशा प्रकारचे देशात निर्बंध लादण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बब्बर खालसा ही एक प्रतिबंधित दहशतवादी संघटना म्हणून घोषित आहे. ब्रिटिश सरकारने व्यावसायिक गुरप्रीत सिंग रेहल याच्यासह त्याच्याशी संबंधित असलेल्या 'बब्बर अकाली लहर' (Babbar Akali Lehar) नावाच्या संस्थेवर दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली निर्बंध (sanctions) लादले आहेत. गुरुप्रीत सिंग रेहल हा भारतात प्रतिबंधित असलेल्या खालिस्तानी दहशतवादी संघटना 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' (Babbar Khalsa International) ला आर्थिक मदत पुरवण्यासह इतर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे.
ब्रिटन ट्रेझरी डिपार्टमेंटनुसार, गुरप्रीत सिंग रेहल हा बब्बर खालसा आणि बब्बर अकाली लहरच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देणे, संघटनांमध्ये तरुणांना आमिष दाखवून भरती करुन घेणे. आर्थिक रसद पुरवत आहे. या प्रकरणी रेहल किंवा बब्बर अकाली लहर यांच्या मालकीचे ताब्यात असलेले किंवा नियंत्रित असलेले ब्रिटनमधील सर्व निधी आणि आर्थिक संसाधने आता गोठवण्यात आली आहेत. रेहलवर संचालक अपात्रतेचे निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे त्याला कोणत्याही कंपनीचा संचालक म्हणून काम करता येणार नाही किंवा तिच्या जाहिरात, स्थापना किंवा व्यवस्थापनात सहभागी होता येणार नाही.
ब्रिटन ट्रेझरी डिपार्टमेंटच्या आर्थिक सचिव लुसी रिग्बी म्हणाल्या, "दहशतवादी ब्रिटनच्या आर्थिक व्यवस्थेचा गैरफायदा घेत असताना आम्ही शांत बसणार नाही. या महत्त्वाच्या कारवाईतून हे स्पष्ट होते की, जगात कुठेही दहशतवाद असो आणि त्याला कोणीही जबाबदार असो, त्याचा निधी रोखण्यासाठी आम्ही आमच्याकडील प्रत्येक साधन वापरण्यास तयार आहोत. ब्रिटन हिंसाचार आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध शांतताप्रिय समुदायांसोबत खंबीरपणे उभा आहे."