Bab el Mandeb Crisis: जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर आधीच संकटाचे ढग दाटले असताना इराणने आणखी एक धमकी दिली आहे. इस्रायलने लेबनॉन आणि गाझामधील हल्ले तातडीने थांबवले नाहीत, तर जगातील अत्यंत महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक असलेला 'बाब-अल-मंदेब' जलमार्ग ठप्प करण्याचा इशारा इराणने दिला आहे. या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि व्यापार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या कुद्स फोर्सचे कमांडर इस्माईल कानी यांनी सोमवारी ही चेतावणी दिली. ते म्हणाले की, इस्रायलने लेबनॉन आणि गाझामध्ये सुरू ठेवलेले हल्ले थांबवले नाहीत तर 'अॅक्सिस ऑफ रेसिस्टन्स'कडून कठोर पावले उचलली जातील. यामध्ये 'बाब-अल-मंदेब' जलमार्गावर नियंत्रण ठेवण्याचाही समावेश असू शकतो.
'अॅक्सिस ऑफ रेसिस्टन्स'मध्ये लेबनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हुती बंडखोर आणि गाझामधील हमास यांसारख्या इराण समर्थित संघटनांचा समावेश आहे.
'बाब-अल-मंदेब' हा अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ 'अश्रूंचे दार' असा होतो. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अरुंद समुद्री मार्ग लाल समुद्र आणि एडनच्या आखाताला जोडतो. याच मार्गातून स्वेझ कालव्याद्वारे आशिया आणि युरोप यांच्यातील मोठ्या प्रमाणावरील व्यापार चालतो.
येमेन, जिबूती आणि एरिट्रिया यांच्या दरम्यान असलेला हा जलमार्ग काही ठिकाणी अवघा 26 ते 29 किलोमीटर रुंद आहे. त्यामुळे या मार्गाचे सामरिक महत्त्व प्रचंड आहे.
जागतिक समुद्री व्यापारातील सुमारे 10 ते 12 टक्के मालवाहतूक या मार्गातून होते. भारत, चीन, जपान यांसारख्या आशियाई उत्पादन केंद्रांतून युरोपमध्ये जाणारी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, वाहने, यंत्रसामग्री, कपडे आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात याच मार्गाने पाठविल्या जातात. जर हा मार्ग बंद झाला, तर आशिया आणि युरोपमधील पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
या मार्गातून दररोज लाखो बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने युरोप व उत्तर अमेरिकेकडे पाठविली जातात. तसेच कतारमधून निर्यात होणाऱ्या नैसर्गिक वायूचा (LNG) मोठा हिस्सा याच मार्गाने जातो.
होर्मुझ सामुद्रधुनी आधीच तणावाच्या केंद्रस्थानी असताना बाब-अल-मंदेबवरही संकट निर्माण झाल्यास जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत येमेनमधील हुती बंडखोरांनी या भागातून जाणाऱ्या जहाजांवर अनेकदा हल्ले केले आहेत. त्यामुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला होता.
जर परिस्थिती आणखी बिघडली, तर जहाजांना आफ्रिका खंडाला वळसा घालून 'केप ऑफ गुड होप' मार्गे युरोपमध्ये जावे लागेल. यामुळे प्रवासाचा कालावधी 10 ते 14 दिवसांनी वाढू शकतो. परिणामी इंधन खर्च, वाहतूक खर्च आणि विमा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढेल.
याचा थेट परिणाम जगभरातील वस्तूंच्या किंमतींवर होण्याची शक्यता आहे. इंधन, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तू महाग होऊ शकतात.
मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष आणि महत्त्वाच्या समुद्री मार्गांवरील अस्थिरता ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर चिंता बनली आहे. बाब-अल-मंदेब जलमार्गावरील कोणतीही अडचण केवळ प्रादेशिक प्रश्न राहणार नाही, तर त्याचे परिणाम जगभरातील उद्योग, व्यापार आणि सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच इराणच्या या धमकीकडे जगभरातील सरकारे, व्यापारी संस्था आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.