Axiom-4 : भारताच्या अंतराळ इतिहासात एक मोठा आणि ऐतिहासिक क्षण येऊ घातला आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला लवकरच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना होणार आहे. अमेरिकेच्या नासाने याबाबत माहिती देताना सांगितले की, Axiom-4 मिशन आता २५ जून रोजी प्रक्षेपित होणार आहे. या मिशनमध्ये भारतासोबत हंगरी आणि पोलंड या देशांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे, हे मिशन तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जात आहे. भारतासाठी हे मिशन खास आहे कारण अनेक वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेप घेणार आहे.
एक्सिओम-4 मिशनचे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून होणार आहे. नासाने सांगितले की, ही मोहीम 25 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 12:01 वाजता स्पेसएक्सच्या (SpaceX) फाल्कन-9 (Falcon-9) रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाईल. मात्र, यापूर्वी या मोहिमेचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलण्यात आले आहे. सुरुवातीला ही मोहीम 29 मे रोजी प्रक्षेपित होणार होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली.
या मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पायलट म्हणून सहभागी होणार आहे. त्याच्यासोबत या मोहिमेत हंगेरीचे तिबोर कापु आणि पोलंडचे स्लावोस उझ्नान्स्की-विस्नेव्स्की मिशन स्पेशलिस्ट म्हणून सहभागी होणार आहेत. संपूर्ण टीमचे नेतृत्व महिला अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. पेगी व्हिटसन या नासाच्या सर्वात अनुभवी अंतराळवीरांपैकी एक आहेत.
या मोहिमेची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलले जात होते. 29 मे नंतर 8, 10 आणि 11 जून रोजी प्रक्षेपण करण्याची तयारी होती, परंतु स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटमधील इंधन गळती (fuel leakage) आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रशियन भागातील गळतीमुळे मोहीम स्थगित करावी लागली. यानंतर 19 जून आणि नंतर 22 जून रोजी प्रक्षेपण करण्याची योजना होती, परंतु नासाने आयएसएसमधील दुरुस्तीच्या कामानंतर सिस्टमची तपासणी करण्यासाठी मोहीम पुढे ढकलली.
एक्सिओम-4 मिशनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही पूर्णपणे व्यावसायिक मोहीम (Commercial Mission) आहे. यामध्ये अंतराळवीर स्पेसएक्सच्या नवीन ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये (Dragon Spacecraft) बसून फाल्कन-9 रॉकेटद्वारे अंतराळात पाठवले जातील. मोहिमेचा एकूण प्रवास सुमारे 14 दिवसांचा असेल, ज्यामध्ये सर्व अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग आणि उपक्रम राबवतील. नासाने सांगितले की, प्रक्षेपणाच्या सुमारे 16 तासांनंतर, म्हणजेच भारतीय वेळेनुसार 26 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजता, ड्रॅगन कॅप्सूल आयएसएससोबत डॉक करेल.