Australia plane crash
सिडनी : ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे आज सकाळी टेक ऑफ करताना एक खासगी विमान कोसळले आणि आग लागली. शेल हार्बर विमानतळावर ही दुर्घटना घडली असून, विमानात असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला.
सिडनीच्या दक्षिणेस अंदाजे ८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेल हार्बर विमानतळावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास या विमानाने उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमान जमिनीवर कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. न्यू साउथ वेल्स अग्निशमन आणि बचाव दलाने ही आग विझवली. मात्र, विमानातील तिघांचाही मृत्यू झाला.
न्यू साउथ वेल्स अग्निशमन आणि बचाव दलाचे निरीक्षक अँड्र्यू बार्बर यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा स्थानिक रुरल फायर सर्व्हिसचे (RFS) युनिट विमानतळावर प्रशिक्षण घेत होते. एका सदस्याने हा अपघात प्रत्यक्ष पाहिला आणि तातडीने मदतीसाठी धाव घेतली. परंतु, इंधनाच्या ज्वलनामुळे परिस्थिती गंभीर असल्याने विमानातील लोकांना वाचवता आले नाही. विमानाचे जळूनखाक होऊन तुकडे-तुकडे झाले.