Australia Election Result
ऑस्ट्रेलियामध्ये अँथनी अल्बानीज यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सलग दुसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. देशाच्या राजकारणात २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान पंतप्रधानाला सलग पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पीटर डटन यांचा पराभव केला. दरम्यान, या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अँथनी अल्बानीज यांचे अभिनंदन केले. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हा ऐतिहासिक विजय दर्शवितो की ऑस्ट्रेलियातील लोकांना अजूनही तुमच्या नेतृत्व क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील खोल धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धीचे आमचे सामायिक ध्येय पुढे नेण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.'
ऑस्ट्रेलियामध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. या देशात मतदान सक्तीचे आहे. ऑस्ट्रेलियन संसदेत दोन सभागृहे आहेत. वरिष्ठ सभागृहाला सिनेट म्हणतात आणि कनिष्ठ सभागृहाला प्रतिनिधीगृह म्हणतात. भारताप्रमाणे, कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो.यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे हे महागाई आणि निवारा हे मुख्य प्रश्न ठरले. याच मुद्द्यांनी निवडणुकीत वर्चस्व गाजवले. शनिवारी सकाळी आठ वाजता १५० जागांसाठी मतदान झाले. यापूर्वी पोस्टल मतदान २२ एप्रिल रोजीच सुरू झाले होते. २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या सार्वत्रिक निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले होते. पंतप्रधान अँथनी अल्बानीज दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळविण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा सामना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पीटर डटन यांच्याशी होता. अखेर अल्बानीज यांना बाजी मारली. जनतेने पुन्हा एकदा देशाची सूत्रे त्यांच्या हाती दिली आहेत.
मार्च २०२३ मध्ये अल्बानीज भारताला भेट दिली होती. त्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी धोरणात्मक भागीदारीअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय वंशाचे लोक राहतात. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून लोकांमधील संबंधांवर नियमितपणे भर दिला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या राजकारणात २१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या विद्यमान पंतप्रधानाला सलग पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र धोरणात सातत्य राहण्यासाठी अँथनी अल्बानीज यांची फेरनिवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.