पुढारी ऑनलाईन डेस्क : ॲपल (Apple) आयफोनसाठी १२ अब्ज डॉलर्स किमतीच्या मेड-इन-इंडिया चिप्ससाठी मायक्रोन, टाटा ग्रुप आणि इतर सेमीकंडक्टर उत्पादकांशी चर्चा करत आहे. त्यामुळे संरक्षण, विमान वाहतूक आणि वाहन क्षेत्र हे इतर मोठे चिप खरेदीदार असतील, परंतु कोणतीही कंपनी ॲपलच्या भारतात उत्पादित मायक्रोचिप्ससाठी केलेल्या खर्चाची बरोबरी करू शकणार नाही, असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. सध्या तैवानची सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (TSMC) ही Apple च्या प्राथमिक पुरवठादारांपैकी एक आहे.
ॲपल (Apple) भारतात बनवलेल्या सेमीकंडक्टर्समध्ये सर्वात मोठा हिस्सा घेण्याची तयारी करत आहे. ॲपलचा जागतिक सेमीकंडक्टर वापर २०११ मध्ये १८.८ अब्ज डॉलर्स वरून २०२२ मध्ये ६७ अब्ज डॉलर्स झाला आहे. सध्या तो सुमारे ७२ अब्ज डॉलर्स आहे. २०२४ या आथिर्क वर्षात Apple ने भारतात १४ बिलियन डॉलर्स किमतीचे iPhones तयार करण्याची योजना आखली आहे. Apple च्या जागतिक आयफोन उत्पादनापैकी ही सुमारे १४ टक्के आहे. तैवानी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (TSMC) ही Apple च्या प्राथमिक पुरवठादारांपैकी एक आहे, ज्याकडे कंपनी त्यांच्या चिप्सचे उत्पादन आउटसोर्स करते. तज्ञांच्या मते, TSMC च्या जागतिक विक्रीपैकी २६ टक्क्यांपेक्षा जास्त ॲपल वापरते. तीन वर्षांपूर्वी ॲपल त्यांचे १०० टक्के आयफोन आणि इतर सर्व ग्राहक उत्पादने चीनमध्ये तयार करत होती.
दरम्यान, भारतात २०२२ मध्ये ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेसह देशांतर्गत Semiconductor Manufacturing उपक्रम सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांच्या पाच चिप प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मायक्रॉन कंपनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर युनिट बांधत आहे, तर टाटा गुजरात तसेच आसाममध्ये चिप युनिट्स उभारत आहे. मायक्रॉन आणि टाटा समुहाच्या युनिट्समध्ये ॲपलसाठी आवश्यक असलेल्या ग्रेडची निर्मिती केली, तर या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.