India China Relations
भारत- चीन संबंध सुधारत असताना चीनची एक नवी चाल समोर आली आहे. ॲपलची सर्वात मोठी आयफोन उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) त्यांची उपकंपनी युझान टेक्नॉलॉजीने भारतातील त्यांच्या युनिटमधून सुमारे ३०० चिनी अभियंत्यांना माधारी बोलावले आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी २ जुलै रोजी फॉक्सकॉनने भारतातील त्यांच्या आयफोन निर्मिती युनिटमधून एवढ्याच संख्येने अभियंते आणि तंत्रज्ञांना माघारी बोलावल्याचे वृत्त समोर आले होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, चीनने फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लियू यांना भारतातील त्यांच्या कंपनीच्या गुंतवणुकीबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. मुख्य म्हणजे iPhone 17 (iPhone 17 series) सीरिजचे लाँचिंग जवळ असताना ही घडामोड समोर आली आहे. ॲपल सप्टेंबरमध्ये २०२५ मधील आयफोन नव्या सीरिजचे लाँचिंग करण्याची शक्यता आहे.
फॉक्सकॉनच्या उपकंपनीला ३०० अभियंत्यांना माघारी बोलावावे लागत आहे. तसेच भारतात आणखी ६० अभियंत्ये येण्याची शक्यता होती. पण आता त्यांचे भारतात येणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.
भारतातून माघारी बोलावलेल्या अभियंत्यांची संख्या थोडी कमी असू शकते. पण त्यांना माघारी बोलावण्यासाठी फॉक्सकॉन तयारी करत असल्याची पुष्टी झाली आहे. ही कंपनी सध्या तामिळनाडूमध्ये १३,१८० कोटी रुपये खर्चून डिस्प्ले मॉड्यूल असेंब्ली युनिटची उभारणी करत आहे.
फॉक्सकॉनने सरकारला कळवले आहे की युझान टेक्नॉलॉजीने युनिट उभे करण्यासाठी भारतात पाठवलेल्या सर्व चिनी कर्मचाऱ्यांना तत्काळ माघारी येण्यास सांगितले आहे," असे एका व्यक्तीने म्हटले आहे.
मे महिन्यात फॉक्सकॉनने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ते चीनमधून बाहेर अॅपलचे उत्पादन वाढवण्यासाठी युझान टेक्नॉलॉजीमध्ये १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल. कारण, चीनला टॅरिफचा मोठा फटका बसला आहे.