ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला.  (Source- X)
आंतरराष्ट्रीय

संतापजनक! ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला, बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, मेंदूला गंभीर दुखापत

Australia racist attack | हल्लेखोर एका वाहनातून आले आणि त्यांनी थेट हल्ला केला, नेमकं काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

Australia racist attack

ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थ्याला वर्णद्वेषी टिप्पणी करत मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील मध्य ॲडलेडमध्ये ही घटना घडली. चरणप्रीत सिंह असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर झालेल्या वर्णद्वेषी हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे ऑस्ट्रिलियात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

द ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, २३ वर्षीय चरणप्रीत सिंह हा १९ जुलै रोजी रात्री ९.२२ वाजता किंटोर अव्हेन्यूजवळ त्याच्या पत्नीसोबत गेला होता. यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या जोडप्याने त्यांची कार पार्क केल्यानंतर त्यांना पाच जणांच्या गटाने घेरले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर एका वाहनातून बाहेर आले आणि त्यांनी थेट हल्ला केला. त्यांनी चरणप्रीत याच्यावर धारधार वस्तूंनी वार केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यात पाच जण शिवीगाळ करत चरणप्रीतला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करताना आणि त्यानंतर ते पळून जाताना दिसतात. या हल्ल्यानंतर चरणप्रीत रस्त्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला.

या हल्ल्यात चरणप्रीतच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक फ्रॅक्चर झाले आहेत.

हॉस्पिटलमधून 9Newsशी बोलताना त्याने म्हटले आहे की, गाडी पार्किंगवरुन वाद सुरु झाला. त्यानंतर त्यांनी थेट हल्ला केला. त्यांनी आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळही केली. त्यानंतर त्यांनी लाथा- बुक्क्या मारण्यास सुरुवात केली," असे चरणप्रीतने सांगितले.

एकाला अटक, चारजण फरार

या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एनफिल्ड येथून एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, उर्वरित हल्लेखोर अद्याप फरार आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तेथील सीसीटीव्हीचीदेखील तपासणी केली जात आहे.

भारतीय समुदायाकडून संताप व्यक्त

या हल्ल्यामुळे ॲडलेडमधील भारतीय समुदायाने संताप व्यक्त केला आहे. तसेच यामुळे ऑस्ट्रेलियात शिकणारे भारतीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. चरणप्रीतला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु करण्यात आली आहे. अनेकांनी वांशिक हल्ले रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT