Jackie Bezos Dies
अब्जाधीश जेफ बेझोस (Amazon founder Jeff Bezos) यांच्या आई आणि ॲमेझॉनच्या पहिल्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या जॅकी बेझोस यांचे गुरुवारी मियामीमध्ये निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. जॅकी बेझोस ह्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर लेवी बॉडी डिमेंशियाने त्रस्त होत्या.
जॅकी बेझोस आणि त्यांच्या पतीने १९९५ मध्ये अमेझॉनमध्ये सुमारे २,४५,००० डॉलरची गुंतवणूक केली होती. हे एक ऑनलाइन बुकस्टोअर असून त्याची स्थापना १९९४ मध्ये त्यांचा मुलगा जेफ बेझोस यांनी केली. ही आता जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे. ज्याचे मूल्य आज जवळपास २.५ ट्रिलियन डॉलर एवढे आहे.
जॅकी बेझोस यांचा जन्म २९ डिसेंबर १९४६ रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे झाला होता. तर न्यू मेक्सिकोतील अल्बुकर्क येथे त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. वयाच्या १७ व्या वर्षी त्या आई झाल्या. जेफ हा त्यांचा पहिला मुलगा आहे.
"वयाच्या १७ व्या वर्षी त्या माझ्या आई बनल्या. त्यांच्यासाठी ते सोपे नव्हते. पण तिने सर्वकाही निभावून नेले," असे जेफ बेझोस यांनी म्हटले आहे.
त्या रात्रशाळेमध्ये शिकल्या. त्या बँकेत काम करत असताना, त्यांची भेट मिगुएल बेझोस यांच्याशी झाली. हा त्यांचा दुसरा पती होता. त्यांच्या वयाच्या जवळपास ६० वर्षांपर्यंत त्यांचे वैवाहिक जीवन राहिले. त्यांनी जेफला दत्तक घेतले. त्यांना क्रिस्टीना आणि मार्क अशी दोन मुले आहेत.
२०२० मध्ये बेझोस यांना लेवी बॉडी डिमेंशियाचे निदान झाले होते. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, ११ नातवंडे आणि एक पणतू असा परिवार आहे, असे बेझोस फॅमिली फाउंडेशनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.