पुढारी ऑनलाईन डेस्क: एलियन्स आहेत की नाहीत? याची चर्चा सुरू राहिल, पण CIA च्या माहितीनुसार एलियन्सच्या हल्ल्यात 23 रशियन सैनिक दगड बनले होते, असे समोर आले आहे. सोव्हिएत रशियाच्या 23 सैनिकांना एलियन्स हल्ल्याला तोंड द्यावे लागले होते.
यात एलियन्सनी या सर्व सैनिकांना दगड बनवून टाकले. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA च्या डीक्लासिफाईड फाईलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. शीतयुद्ध काळात 1989-1990 दरम्यान सायबेरियात झालेल्या सैन्य प्रशिक्षणात हा प्रकार घडला होता.
या विचित्र आणि थरकाप उडवणाऱ्या घटनेचे तपशील काही साक्षीदारांनीच दिले आहेत. एलियन्सच्या या हल्ल्यातून दोन सैनिक बचावले होते. त्यांच्या साक्षीतून ही माहिती समोर आली आहे.
एलियन्सनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या सैनिकांचे दगडात रूपांतर केल्याचे सांगितले जात आहे. CIA चा हा डीक्लासिफाईड दस्तऐवज एकाच पानाचा आहे. त्यातील दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
या घटनेचा अहवाल शीतयुद्धाच्या काळात, 1989 किंवा 1990 मध्ये, सायबेरियातील एक सैन्य प्रशिक्षणादरम्यान घडला असल्याचा दावा केला जातो. हे 1991 मध्ये सोविएत युनियनची शकले झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तेव्हा रशियाची गुप्तहेर संघटना KGB चेदेखील विघटन झाले.
KGB ने तयार केलेल्या 250 पानांचा अहवाल नंतर CIA ने हस्तगत केला. त्यामध्ये या आश्चर्यकारक घटनेचा तपशील देण्यात आला आहे. सोविएत सैन्याच्या एका युनिटने एका UFO ची ओळख पटवली होती, असे त्यात म्हटले आहे.
या दस्तऐवजात अनेक छायाचित्रे, रेखाचित्रे आणि घटनेतील सहभागी व्यक्तींच्या प्रत्यक्ष साक्षींचा समावेश आहे. CIA च्या प्रतिनिधीने या प्रकरणाला "परदेशी प्रजातींच्या कडून घेतलेल्या प्रतिशोधाची एक भयानक छबी, जी पाहिल्यानंतर आपले रक्त थंड होते" असे वर्णन केले होते.
त्या अहवालात असा दावा केला गेला आहे की, "एक लहान उडणारे अंतराळ यान या सैन्याच्या तुकडीच्या डोक्यावरून आकाशातून जात होते. सैन्याने एक सर्फेस-टू-एअर मिसाईल त्या UFO वर डागले. ते पृथ्वीवर पडले आणि त्यातून पाच लहान ह्युमनॉईड्स (humanoids) बाहेर आले. त्यांच्या डोक्यांचे आकार मोठे होते आणि डोळे काळे होते."
"एलियन्स जवळ आले आणि नंतर ते एकाच वस्तूमध्ये एकत्रित झाले, त्याला गोलाकार प्राप्त झाला. त्या वस्तूने भयंकर आवाज काढला आणि नंतर ती तीव्रपणे पांढरी होऊन चमकली. काही सेकंदात, गोलाकार वस्तू खूप मोठी झाली आणि ती अत्यंत तेजस्वी प्रकाशाने स्फोट झाला.
त्या क्षणी, 23 सैनिक जे घटना पाहत होते ते दगडाच्या खांबात बदलले," असे बचावलेल्या सैनिकांनी सांगितले. आम्ही सावलीत होतो आणि तीव्र प्रकाशापासून दूर होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
KGB च्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, "दगडात रूपांतरीत झालेले सैनिक" आणि UFO चे अवशेष रशियाची राजधानी मॉस्कोजवळील एका गुप्त वैज्ञानिक संशोधन केंद्रात नेले गेले.
सोविएत तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला की "एका अनोळखी ऊर्जा स्रोताने सैनिकांच्या जैविक संरचनेत तात्काळ बदल घडवलिल्यामुळे त्यांचे रूपांतर दगडासारख्या पदार्थात झाले. त्या दगडाची अणू संरचना चुनखडकासारखी होती."
CIA ने अहवालाच्या अखेरीस म्हटले आहे की, "जर KGB ची फाईल वास्तवाशी जुळत असेल, तर हे एक अत्यंत धोकादायक प्रकरण आहे. एलियन्सकडे अशी शस्त्रे आणि तंत्रज्ञान आहे जे आपल्या सर्व अनुमानांच्या पलीकडचे आहे. ते स्वतःचा बचाव करण्यासाठी सक्षम आहेत."
CIA च्या दस्तऐवजाचे डीक्लासिफिकेशन
CIA च्या दस्तऐवजाचे डीक्लासिफिकेशन 2000 मध्ये झाले आणि त्यावर पहिल्यांदा कॅनडातील 'वीकली वर्ल्ड न्यूज' आणि यूक्रेनी वृत्तपत्र 'होलोस उक्रायिनी'मध्ये माहिती प्रसारीत झाली होती. ही कथा 2024 मध्ये 'द जो रोगन एक्सपीरियन्स' पॉडकास्टवर पुन्हा चर्चेत आली.