AI lottery win
व्हर्जिनिया : नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना सल्ला द्यायचा असो किंवा कुणाच्या मनाची भावना समजून घ्यायची असो, आजकाल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अनेक प्रकारे लोकांची मदत करत आहे. आता तर AI लॉटरी जिंकण्यातही मदत करत असल्याचं एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील मिडलोथियन शहरात राहणाऱ्या कॅरी एडवर्ड्स यांनी चॅटजीपीटी या एआय ॲपच्या मदतीने १.२५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली असून, ही सर्व रक्कम त्यांनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅरी यांनी ८ सप्टेंबर रोजी व्हर्जिनिया लॉटरीमध्ये चार अचूक क्रमांक आणि पॉवरबॉल मिळवून ही लॉटरी जिंकली. सुरुवातीला त्यांना ५०,००० अमेरिकन डॉलर्स (जवळपास ४२ लाख रुपये) मिळणार होते. पण त्यांनी 'पॉवर प्ले' नावाचा पर्याय निवडला, ज्यात केवळ एक डॉलर अधिक भरल्यावर बक्षीस तिप्पट झाले आणि त्यांना १,५०,००० डॉलर्स (जवळपास १.२५ कोटी रुपये) मिळाले.
कॅरी यांनी सांगितलं की त्यांनी आजपर्यंत कधी लॉटरी काढली नाही. एका पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, त्यांनी त्यांच्या फोनवरील चॅटजीपीटी ॲपला सहजच, "माझ्याशी बोल... माझ्यासाठी काही नंबर आहेत का?" असं विचारलं होतं आणि चॅटजीपीटीने दिलेल्या नंबरचा त्यांनी लॉटरीसाठी वापर केला.
दोन दिवसांनंतर, जेव्हा त्या एका बैठकीत होत्या, तेव्हा त्यांच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं, ज्यामुळे त्यांना धक्का बसला. सुरुवातीला त्यांना वाटलं की ही कोणतीतरी फसवणूक आहे, पण जेव्हा त्यांनी खात्री केली, तेव्हा त्यांना या आयुष्य बदलवणाऱ्या विजयावर विश्वास बसला.
ही मोठी रक्कम जिंकल्यानंतर कॅरी यांनी कोणताही विचार न करता ती दान करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, "हे बक्षीस मिळाल्यावर लगेच माझ्या लक्षात आलं की मला या पैशांचं काय करायचं आहे. मला आधीच खूप काही मिळालं आहे, त्यामुळे हे सर्व पैसे दान करावे असं मला वाटलं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही चांगलं मिळतं, तेव्हा त्याने इतरांची मदत करावी, हे दाखवून देणारं एक उदाहरण मला तयार करायचं आहे."
कॅरी एडवर्ड्स यांनी मिळालेले १,५०,००० डॉलर्स तीन वेगवेगळ्या संस्थांना वाटले. पहिला भाग 'असोसिएशन फॉर फ्रंटोटेम्पोरल डिजेनरेशन' या संस्थेला दिला. ही संस्था अशा आजारावर संशोधन करते, ज्यामुळे २०२४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. दुसरा भाग 'शालोम फार्म्स' ला दिला, जो भूक निवारणासाठी काम करतो, आणि तिसरा भाग 'नेव्ही-मरीन कॉर्प्स रिलीफ सोसायटी' ला दिला, जी त्यांच्या वडिलांशी संबंधित आहे. तिचे वडील एक फायटर पायलट होते. कॅरीच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.