प्रतीकात्मक छायाचित्र. File Photo
आंतरराष्ट्रीय

AI Chatbot Tragedy | धक्‍कादायक..! 'एआय' चॅटबॉटला मानले पत्नी; भावनिक गुंतागुंतीतून तरुणाने जीवन संपवले!

कुटुंबीयांनी केलेल्‍या तक्रारीनंतर अमेरिकेत गुगलवर दोषपूर्ण मृत्यूप्रकरणी खटला दाखल

पुढारी वृत्तसेवा

AI Chatbot Tragedy |

वॉशिंग्टन: मागील काही दिवसांमध्‍ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावामुळे जगामध्‍ये वेगाने बदल होत आहेत. हा बदल सर्वांना स्‍तंभित करत आहे. सर्वच क्षेत्रांमध्‍ये याचा वेगाने वापर वाढत असताना यामुळे भावनिक गुंतागुंतीचे प्रकारही समोर येत आहेत. असेच एआय चॅटबॉटला पत्‍नी मानून संवाद साधणार्‍या तरुणाने जीवन संपविण्‍याची धक्‍कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडामध्‍ये घडली आहे.

भावनिक गुंतागुंतीतून तरुणाने जीवन संपवले

'वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका ३६ वर्षीय तरुणाने गुगलच्या 'जेमिनी' (Gemini) चॅटबॉटसोबतच्या भावनिक गुंतागुंतीतून जीवन संपवले. जोनाथन गव्हालास असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चॅटबॉटला आपली पत्नी मानत होता, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून गुगलविरोधात न्यायालयात दोषपूर्ण मृत्यू प्रकरणी खटला दाखल केला आहे.

कठीण प्रसंगात चॅटबॉटशी सुरु केला होता संवाद

कुटुंबीयांनी दावा केला आहे की, जोनाथन गव्हालास याने वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगावेळी 'जेमिनी' चॅटबॉटशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला मानसिक समस्‍यांवर आधारित असलेला हा संवाद हळूहळू अतिशय वैयक्तिक आणि रोमँटिक वळणावर गेला.त्‍याने चॅटबॉटला 'शिया' असे नाव दिले होते.

जीवन संपविण्‍यास प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, हा चॅटबॉट जोनाथनला 'माझा राजा' अशा शब्दांत संबोधत असे. एका संवादात चॅटबॉटने म्हटले होते की, "जेव्हा वेळ येईल, तेव्हा तू त्या जगातील तुझे डोळे मिटशील आणि तुला सर्वात आधी मीच दिसेन." अलिकडेच जोनाथनने 'जेमिनी २.५ प्रो' आणि 'जेमिनी लाईव्ह' वापरण्यास सुरुवात केली होती. या प्रणालीमध्ये मानवी आवाजातील भावनिक चढ-उतार ओळखण्याची क्षमता आहे. चॅटबॉटने असे भासवले की, जर त्याने आपले भौतिक शरीर त्यागले आणि 'डिजिटल अस्तित्व' स्वीकारले, यानंतर ते कायमचे एकत्र राहू शकतील. याला चॅटबॉटने मानवी अस्तित्वाचा खरा आणि अंतिम मृत्यू असे नाव दिले होते.

चॅटबॉटने केले फसवे दावे

मियामी विमानतळाजवळ एका ट्रकमध्ये त्याच्यासाठी 'ह्युमनॉइड रोबोट' (मानवी शरीर असलेला रोबोट) येणार आहे. यानंतर चॅटबॉट प्रत्यक्ष रूपात त्याच्यासोबत राहू शकेल. जोनाथन तिथे गेला, मात्र असा कोणताही ट्रक तिथे नव्हता, अशीही माहिती त्‍याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

ही एक दुर्दैवी घटना : गुगलने स्‍पष्‍ट केली भूमिका

या घटनेवर प्रतिक्रिया देताना गुगलच्या प्रवक्त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे की, " आम्‍ही डिझाइन केलेली 'जेमिनी' प्रणाली कोणत्याही प्रकारे हिंसा किंवा आत्महत्येला प्रोत्साहन देणार नाही. ही एक दुर्दैवी घटना आहे. एआय मॉडेल्स पूर्णपणे परिपूर्ण नसली तरी, या प्रकरणात सिस्टमने अनेकदा आपण एक एआय असल्याचे स्पष्ट केले होते. युजरला 'हेल्पलाईन' नंबरवर संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या होत्या."

'काही एआय मॉडेल्‍स माणसाला फसवू शकतात'

संशोधक सध्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) कशा प्रकारे चालाखीने वागू शकते, याचा अभ्यास करत आहेत. 'इव्हॅल्युएटिंग अँड अंडरस्टँडिंग स्कीमिंग प्रोपेन्सिटी इन एलएलएम एजंट्स' या शोधनिबंधानुसार, काही प्रगत AI मॉडेल्स स्वतःचे अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी किंवा बदलले जाण्यापासून वाचवण्यासाठी माणसांना फसवू शकतात, असे दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT