shehbaz sharif - donald trump  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Trump Pakistan Tariff | अमेरिका पाकिस्तानवर मेहेरबान! तेल करारानंतर ट्रम्प यांनी पाकसाठी घेतला 'हा' लाभदायी निर्णय...

Trump Pakistan Tariff | ट्रम्प यांच्याकडून भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि दंड, तसेच मृतप्राय अर्थव्यवस्था अशी टीका

Akshay Nirmale

Trump Pakistan Tariff

वॉशिंग्टन/इस्लामाबाद ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एकीकडे भारतावर 25 टक्के टॅरिफचा बॉम्ब, अतिरिक्त दंड लावत आहेत. तसेच रशियाच्या व्यापाराऱ्यावरून भारत आणि रशिया या दोन्ही अर्थव्यवस्था मृतप्राय झाल्या आहेत, अशीही टीका करत आहेत. ट्रम्प यांचा हा सगळा भारतासोबतचा व्यवहार सुरू असताना भारताचा शेजारी देश पाकिस्तानवर मात्र ट्रम्प मेहेरबान झाल्याचे दिसून येत आहे.

ट्रम्प यांनी पाकिस्तानशी नुकताच तेल करार केला आणि आता त्यानंतर पाकिस्तानला लाभदायी असा आणखी एक निर्णय त्यांनी घेतला आहे.

पाकिस्तानवर लावलेले आयात शुल्क 29 टक्क्यांवरून थेट 19 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर आता कमी दराने शुल्क आकारले जाईल.

नवीन टॅरिफ आदेश जाहीर

या नव्या कार्यकारी आदेशामध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, काही व्यापार भागीदार देशांनी अमेरिका सोबत व्यापार व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अटी मान्य केल्या आहेत किंवा त्या मान्य करण्याच्या तयारीत आहेत. अशा देशांवर सौम्य धोरण राबवले जाईल.

तर, काही देशांनी अजूनही अपेक्षित पावले उचललेली नाहीत किंवा अमेरिकेच्या सुरक्षात्मक धोरणाशी सहकार्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या आयात वस्तूंवर अधिक दराचे शुल्क लागू केले जाईल. उदाहरणादाखल, भारतावर 25 टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. हा नवीन दर 7 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.

सुरक्षा आणि व्यापार धोरणाचे समीकरण

ट्रम्प यांनी आदेशात नमूद केले की, काही देश हे अजूनही अमेरिकेशी सुसंगत व्यापार धोरणात सहभागी होत नाहीत किंवा त्यांच्या सुरक्षाविषयक भूमिकेमुळे धोका निर्माण होतो. अशा देशांबाबत अमेरिकेला अधिक कठोर पावले उचलावी लागत आहेत.

अमेरिका-पाकिस्तानमधील व्यापार

अमेरिका पाकिस्तानकडून मुख्यतः टेक्स्टाइल्स (कापड व तयार कपडे), क्रीडा साहित्य, लेदर जॅकेट्स, शूज, बॅग्ज, भांडी व हस्तकला उत्पादने, तंबाखू उत्पादने आयात करतो.

तर अमेरिका पाकिस्तानला मशिनरी व औद्योगिक उपकरणे, वैद्यकीय उपकरणे व औषधे, अन्नधान्य व कृषी उत्पादने, गहू, मका, सोया, संगणक, मोबाइल फोन, वाहने व त्यांच्या सुट्या भागांची निर्यात करते.

याशिवाय अनेक पाकिस्तानी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. आउटसोर्सिंग आणि IT प्रकल्पातील अनेक कामे पाकिस्तानातून अमेरिकन कंपन्यांसाठी पार पाडली जातात. दोन्ही देशांत परस्पर आयात निर्यात 7-8 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते.

अमेरिका-पाकिस्तानमध्ये तेल करार

ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सांगितले की, "आम्ही पाकिस्तानसोबत एक करार पूर्ण केला आहे ज्यामध्ये अमेरिका आणि पाकिस्तान मिळून पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर असलेले तेल साठे विकसित करण्यावर काम करतील."

ते पुढे म्हणाले, "या करारासाठी कोणती तेल कंपनी निवडायची हे लवकरच ठरेल. कदाचित हे तेल एक दिवस भारतालाही विकले जाईल!"

या निर्णयामुळे अमेरिका-पाकिस्तान व्यापार संबंधांमध्ये नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. तेलसाठ्यांच्या विकासातून पाकिस्तानला आर्थिक फायदा होईल तर अमेरिका या साठ्यांतून ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे धोरण आखू शकते. मात्र, भारतावर वाढवलेले शुल्क हा वेगळा मुद्दा बनू शकतो, जो दक्षिण आशियाई व्यापारसंबंधांवर परिणाम करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT