After Pahalgam attack India preparing to attack Pakistan New York Times claims
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अमानुष अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकार शांत बसणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या एका विशेष अहवालात दावा केला आहे की, भारत सरकार पाकिस्तानविरोधात निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील डझनभर प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. या संवादाचा उद्देश भारत पाकिस्तानविरोधात काय कारवाई करणार आहे, याची स्पष्ट माहिती देणे हाच होता.
पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात नमूद केलं की, भारत अतिरेकी हल्ल्याबाबत केवळ निषेध करून थांबणार नाही, तर निर्णायक कारवाई करणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीतील जवळपास 100 देशांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांना विशेष माहिती सत्रासाठी आमंत्रित केले होते.
या सत्रात पाकिस्तानच्या अतिरेकी गटांशी असलेल्या संबंधांबाबत भारताने गुप्तचर यंत्रणेने दिलेली काही माहिती शेअर केल्याचेही बातमीत नमूद केले आहे. त्यामध्ये हल्लेखोरांचे चेहरे, हालचाली आणि पाकिस्तानशी असलेली नाळ दर्शवणारे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
बिहारच्या मधुबनी येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानातील अतिरेकी नेतृत्वाला उद्देशून कठोर शब्दांत इशारा दिला.
“एकून एक दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढू, कुठेही लपले असले तरी त्यांना शिक्षा दिली जाईल. त्यांनी कल्पनेतही विचार केला नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
परराष्ट्र मंत्रालयाने राजनयिकांना (मुत्सद्दी अधिकाऱ्यांना) पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना सातत्याने मिळणाऱ्या मदतीचा 'पॅटर्न' समजावून सांगितला. भारताला लक्ष्य करणाऱ्या अतिरेकी गटांना पाकिस्तानकडून संरक्षण, प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळते, असेही या सत्रात स्पष्ट करण्यात आले.
न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार, भारताच्या रणनीतीबाबत दोन शक्यता दिसत आहेत:
भारत अजून माहिती संकलनात व्यस्त आहे, आणि त्यानंतरच कारवाई करेल.
सध्याच्या जागतिक अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारताला पाकिस्तानविरोधातील कारवाईसाठी जागतिक समर्थन मिळवण्याची फारशी आवश्यकता भासत नाही.
अमेरिकेचा पाठिंबा, पण भूमिका स्पष्ट नाही
या बातमीत असेही म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारताला ठाम पाठिंबा दर्शवला आहे.
मात्र युद्धाच्या स्थितीत अमेरिका प्रत्यक्ष सहभागी होईल का, याबाबत अजून अनिश्चितता आहे. अमेरिका सहभाग घेणार नसली तरी या संघर्षावर अमेरिकेचा प्रभाव नक्कीच राहिल.