Pakistan Defense Budget 2025
इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने आता त्यांच्या यंदाच्या संरक्षण बजेटमध्ये तब्बल 20 टक्क्यांची वाढ केली आहे. भारताच्या "ऑपरेशन सिंदूर"नंतर अवघ्या काही आठवड्यांत ही घोषणा झाल्याने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेतील गडबड स्पष्ट झाली आहे.
पाकिस्तानने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी संरक्षण बजेटतरतूद 2.55 लाख कोटी रूपये (अंदाजे 9 अब्ज डॉलर) इतकी झाली आहे. गतवर्षी (2024-25) ही तरतूद 2.12 लाख कोटी रुपये होती, जी 2023-24 च्या ₹1.80 लाख कोटीच्या तुलनेत 17.6% अधिक होती.
या वाढीमागे भारताशी झालेल्या सैन्य संघर्षानंतर संरक्षण यंत्रणेतील कमकुवत बाजू उघड झाल्याचा आणि संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी निधीची आवश्यकता असल्याचा विचार केला जातो.
तथापि, या वाढीमुळे पाकिस्तानच्या आर्थिक संकटात आणखी भर पडण्याची शक्यता आहे, कारण देशाच्या एकूण बजेटमध्ये संरक्षणासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भारताने 7 ते 10 मे 2025 दरम्यान केलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तानातील अनेक दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि लष्करी सुविधा नष्ट केल्या. या हल्ल्यांतून पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणांतील गंभीर त्रुटी उघड झाल्या.
चीनकडून मिळवलेली HQ-9 SAM यंत्रणा आणि तुर्कीचे Bayraktar TB2 ड्रोन भारतीय ड्रोन व क्षेपणास्त्रांना अडवण्यात अपयशी ठरले. यामध्ये नूर खान एअरबेसवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ज्यामुळे पाकिस्तानला त्यांचे संरक्षण धोरण पूर्णपणे बदलण्याची गरज निर्माण झाली.
चीन, जो स्वतःला Tier 1 शस्त्र उत्पादक म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या माध्यमांतून ऑपरेशन सिंदूरबाबत खोटा यशाचा प्रचार केला जात आहे. गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानच्या संरक्षण बजेट वाढीमागे चीनचा प्रभाव आहे आणि त्यामुळे रावळपिंडीला अधिक नियंत्रण मिळाले आहे.
तथापि, या संरक्षण बजेट वाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे की, हा निधी ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या दहशतवादी तळांचे पुनर्निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ शकतो. या पावलामुळे पाकिस्तानच्या आर्थिक अडचणी आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. देशावर आधीच 76007 अब्ज कर्ज असून, आयएमएफकडून पाकिस्तान नवे कर्ज घेत आहे.
पाकिस्तानने आपल्या हवाई दलासाठी चीनकडून J-35 स्टेल्थ फायटर्स खरेदी करण्याचे ठरवले असून, पहिला ताफा ऑगस्ट 2025 मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
याशिवाय, 400 किमीपर्यंत मारकक्षमता असलेल्या PL-17 क्षेपणास्त्रांची खरेदी केली जात आहे, जी भारतीय AWACS आणि हवेतून इंधन भरणाऱ्या विमानांना लक्ष्य करु शकतात.
नौदलाला बळकट करण्यासाठी Type 039B पाणबुडी आणि जिन्ना-श्रेणीचे फ्रिगेट सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.
तसेच, स्पेस आणि ISR (Intelligence, Surveillance & Reconnaissance) क्षेत्रात गुंतवणूक करत, चिनी BeiDou उपग्रह प्रणालीशी अधिक सहकार्य वाढवण्याची पाकची योजना आहे, जेणेकरून रिअल-टाईम युद्धमाहिती मिळवता येईल.
बजेटमधील हा वाढीव खर्च केवळ भारताशी संघर्षासाठी नसून, बलुचिस्तान व खैबर पख्तुनख्वामधील अंतर्गत बंडखोरी दडपण्यासाठीही केला जात असल्याचे गुप्तचर सूत्रांचं म्हणणं आहे. बाह्य शत्रूचा हवाला देत पाकिस्तान सरकार देशातील असंतोष दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
एकंदरीत पाकिस्तानचा संरक्षण खर्च वाढीचा निर्णय ही लष्करी पराभवावर पांघरूण टाकण्याची धडपड वाटते. विकास, आरोग्य, शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना दुर्लक्षित करत फक्त संरक्षणावर भर देणं, ही आत्मघातकी भूमिका ठरू शकते.