‘एअर स्ट्राईकचा नक्की बदला घेऊ’, १९ मृत्यूंमुळे संतप्त अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला इशारा file photo
आंतरराष्ट्रीय

‘एअर स्ट्राईकचा नक्की बदला घेऊ’, १९ मृत्यूंमुळे संतप्त अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला इशारा

१९ जणांचा मृत्यू, काबूल–कंधारमध्ये आपत्कालीन बैठक; पाकिस्तानविरोधात अफगाण तालिबान आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

afghanistan taliban regime warns pakistan of retaliation after airstrikes

पुढारी ऑनलाईन

अफगाण तालिबानने पाकिस्तानला प्रत्युत्तरात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. तालिबानने पाकिस्तानवर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानकडून पक्तिका, नांगरहार आणि खोस्त प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर तालिबान प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काबूल आणि कंधार येथे आपत्कालीन बैठका बोलावल्या आहेत.

रविवारी अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने सांगितले की, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचा आढावा घेतला जात असून प्रत्युत्तरात्मक कारवाईचा पर्याय खुला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान–पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा टोकाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी निवेदनात पाकिस्तानवर अफगाण सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आणि निष्पाप नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, “पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा अफगाण भूमीत घुसखोरी केली आहे. काल रात्री नांगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये आमच्या नागरिकांवर बॉम्बहल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत महिला आणि मुलांसह अनेक जण ठार व जखमी झाले आहेत. पाकिस्तानी जनरल अशा गुन्ह्यांद्वारे त्यांच्या देशातील सुरक्षा अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.” पाकिस्तानी हवाई हल्ल्यांत एका कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

तालिबानच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा अधिकारी घेत आहेत. अद्याप तालिबानकडून कोणतीही तात्काळ कारवाई जाहीर करण्यात आलेली नसली, तरी नेतृत्वाने प्रत्युत्तर देण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत. सूत्रांनी तालिबानच्या हवाल्याने सांगितले, “पाकिस्तानने अफगाण हवाई क्षेत्राचे उल्लंघन केले आहे आणि अफगाणिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. योग्य वेळी आम्ही प्रत्युत्तरात्मक हल्ला करू.”

काबूल आणि कंधारमध्ये आपत्कालीन बैठका

पक्तिका आणि नांगरहारमधील पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी तालिबान प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काबूल आणि कंधार येथे आपत्कालीन बैठका घेतल्या आहेत. सूत्रांनी सांगितले, “पाकिस्तानी हल्ल्यांबाबत आत्ताच ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, पण काबूलकडून निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल.” यावरून अंतर्गत चर्चेनंतर तालिबानकडून पाकिस्तानविरोधात अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाकिस्तानने दावा केला आहे की, सीमा ओलांडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा उद्देश दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करणे हाच होता. पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, पक्तिका, पक्तिया, नांगरहार आणि खोस्त प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या अचूक हल्ल्यांत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. रविवारी पहाटे पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील ड्युरंड रेषेजवळ (अफगाणिस्तान–पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा) अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले.

पाकिस्तानचा दहशतवादी तळांवर हल्ल्याचा दावा

पाकिस्तानी वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी कथितरित्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या तळांना लक्ष्य केले. पक्तिका प्रांतातील बर्मल जिल्ह्यातील एका मदरशावरही हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक सूत्रांनी अनेक स्फोट झाल्याची माहिती दिली. मरघा भागात सलग स्फोट झाल्याच्या बातम्या आहेत. पाकिस्तानने बर्मलमधील बनूसी मदरशावर क्षेपणास्त्रे डागल्याचेही सांगण्यात येते. या मोहिमेत पाकिस्तानी वायुसेनेने एफ-16 आणि जेएफ-17 थंडर या लढाऊ विमानांचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT