

कागल ः दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी लिहिलेला ‘सिंहायन’ हा गौरव ग्रंथ केवळ राजकीयच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव आणि दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्यामधील स्नेहबंधामुळेच या गौरव ग्रंथाचे वितरण कारखाना कार्यस्थळावरून व्हावे, अशी आमची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली.
छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या दरबार हॉलमध्ये शिवराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ‘सिंहायन’ गौरव ग्रंथाच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. दै. ‘पुढारी’चे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगले यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा हा गौरव ग्रंथ म्हणजे एक अमृतकलश असल्याचे मत व्यक्त केले. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंग घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शिवराज पतसंस्थेचे संस्थापक रमेश माळी, गटनेते दीपक मगर, डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ. कमलाकर मेंच आदी मान्यवर उपस्थित होते.
कागल शहरातील ज्येष्ठ नागरिक, वाचनप्रेमी आणि विविध ग्रंथालयांना यावेळी ‘सिंहायन’ ग्रंथाच्या प्रती मोफत भेट देण्यात आल्या. तत्पूर्वी उपस्थितांचे स्वागत शिवराज पतसंस्थेचे संस्थापक आणि शाहू कारखान्याचे संचालक रमेश माळी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाहू ग्रुपचे पदाधिकारी, नगरसेवक, सभासद, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन माळी यांनी आभार मानले.