Afghanistan Foreign Minister :
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी हे भारत भेटीवर येणार आहे. ते ९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत पोहचतील असं अंदाज वर्तवण्यात आला आहे. तालीबाननं अफगाणिस्तानमधील सत्ता आपल्या हातात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे.
भारत आणि तालीबान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षापासून चांगलेच सुधारले आहेत. भारतानं अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोणातून लोककल्याणाचं चांगलं काम सुरू केलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालीबानसोबतचे भारताचे संबंध दिवसेंदिवस सुधारत आहेत.
त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे आता अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी हे ऑक्टोबर महिन्याच्या ९ - १० तारखेला भारत दौऱ्यावर येत आहेत. ते या भेटीदरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
या भेटीसाठी भारत सरकार ऑगस्ट महिन्यापासून अफगाणिस्तानातील तालीबानी प्रशासनासोबत चर्चा करत होते. मुत्तकी यांच्यावर युनायटेड नेशनने ट्रॅव्हल बॅन घातला होता. भारतानं या युएन सुरक्षा काऊन्सीलकडे या बंदीत शिथीलता यावी यासाठी संपर्क केला होता. भारताची ही विनंती मान्य केल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतरच अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
तालिबान प्रशासनाखालील अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अधिकृतरित्या भारताच्या दौऱ्यावर येणे हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. भारतानं देखील आपले तालीबान सोबतचे संबंध सुधारण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यांच्यासोबत बॅक डोअर चर्चेचा मार्ग कायम खुला ठेवण्यात आला. भारतानं जरी तालीबानी सत्तेला अधिकृतरित्या मान्यता दिली नसली तरी त्यांच्यासोबत चर्चेची दारं उघडी ठेवून एक सकारात्मक संदेश दिला होता. याचाच भाग म्हणून परराष्ट्र सचिव विक्रम मेस्री यांनी दुबईत मुत्तकी यांची भेट घेतली होती.