Ethiopia Volcano Erupts After 12,000 Years: इथिओपियाच्या अफार प्रदेशात तब्बल 12,000 वर्षांनंतर एक प्रचंड ज्वालामुखी अचानक सक्रिय झाला आणि क्षणार्धात आफ्रिका–आशियातील अनेक देशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. या ज्वालामुखीतून तब्बल 14 किलोमीटर उंचीपर्यंत राख आणि धुराचे विशाल ढग आकाशात गेले. या राखेचा प्रवाह वातावरणीय वाऱ्यांसह इतका दूरवर पोहोचला की त्याचा धूर भारतापर्यंत पोहचला.
पूर्व आफ्रिकेच्या हॉर्न भागातील इथिओपिया हा इतिहास, परंपरा आणि प्राचीन संस्कृती जपणारा देश म्हणून ओळखला जातो. लाल समुद्राच्या दक्षिण-पश्चिमेकडील या देशाला इरिट्रिया, जिबूती, सोमालिया, केन्या आणि दक्षिण सूदान यांनी वेढले आहे. हा आफ्रिकेतील एकमेव देश आहे जो कधीही युरोपीय सत्तेखाली नव्हता. 3,000 वर्षांची परंपरा, स्वतःचे कॅलेंडर, स्वतःची भाषा आणि स्वतंत्र संस्कृती इथिओपिया देशाला आहे.
इथिओपियात 80 पेक्षा जास्त जातीय गट राहतात आणि बहुसंख्य लोक प्राचीन इथिओपियन ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायी आहेत. या देशाची एक अतिशय अनोखी परंपरा म्हणजे 13 महिन्यांचं वर्ष. सामान्य 12 महिन्यांसोबत इथिओपियात एक 13वा छोटा महिना असतो, ज्याचे फक्त 5 दिवस असतात. लीप इयरमध्ये हा महिना 6 दिवसांचा होतो.
इथिओपिया हा जगातील एकमेव देश आहे जिथे आजही गीज़ कॅलेंडर वापरलं जातं. हे कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा 7–8 वर्ष मागे आहे. म्हणूनच जग 2025 मध्ये असताना इथिओपिया अजूनही 2018 मध्ये आहे.
गीज़ कॅलेंडर हे प्राचीन कोप्टिक इजिप्शियन कॅलेंडरवर आधारित आहे. कारण इथिओपिया कधीही बाहेरील सत्तांच्या प्रभावाखाली आला नाही, त्यामुळे त्यांनी जुन्या परंपरा जसाच्या तशा जपल्या आहेत.
इथिओपियात वर्षाचे 12 महिने प्रत्येक 30 दिवसांचे असतात.
360 दिवस + 5 विशेष दिवस = 365 दिवस
हे पाच दिवस पागुमेन म्हणून वेगळ्या 13व्या महिन्यात टाकले जातात.
लीप इयरमध्ये पागुमेन 6 दिवसांचा होतो.
इथिओपियात यामुळे एक लोकप्रिय म्हण आहे: “We have 13 months of sunshine.”
इथिओपियात नवीन वर्षाचा पहिला दिवस मेकेरेम (Meskerem) म्हणून ओळखला जातो आणि तो ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 11 किंवा 12 सप्टेंबरला येतो. हा ‘फुलांचा महिना’ मानला जातो.
इथिओपियातील घड्याळ मोजणी जगभरातील पद्धतीपेक्षा पूर्ण वेगळी आहे. ते वेळेची गणना सूर्योदयापासून करतात. सूर्योदय साधारण 6 वाजता होत असला तरी इथिओपियन टाइममध्ये तो 12:00 Day मानला जातो. म्हणूनच इथिओपियन वेळ आणि जगातील वेळ यात मोठा फरक पडतो.
अफार प्रदेशातील हा ज्वालामुखी 12 हजार वर्षांनंतर सक्रिय झाल्याने वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले आहेत. धुराचे ढग वातावरणात वर गेल्याने त्याचा परिणाम आफ्रिका आणि आशिया दोन्ही खंडांवर होत आहे. हवेत पसरलेली राख श्वसनासाठी धोकादायक असून विमानवाहतूकही विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इथिओपिया हा इतिहास, विज्ञान, धर्म आणि आधुनिक काळ यांचे अनोखे मिश्रण असलेला देश आहे.