Harvard university foreign student crisis 72-hour deadline Trump Harvard antisemitism
वॉशिंग्टन / केम्ब्रिज : हार्वर्ड विद्यापीठात सध्या शिक्षण घेत असलेल्या 6800 आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यामध्ये 800 भारतीय विद्यार्थी असून त्यांना अमेरिकेत राहण्यासाठी लागणारी कायदेशीर स्थिती गमावण्याची वेळ आली आहे.
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचा SEVP (Student and Exchange Visitor Program) प्रमाणन रद्द केल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र या निर्णयात 72 तासांची शिथिलता देत, ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला पुन्हा परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची संधी दिली आहे. तथापि, त्यासाठी 6 कठोर अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे, असं गृह सुरक्षा विभाग (Department of Homeland Security – DHS) कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
1. गेल्या 5 वर्षांतील सर्व अवैध कृतींचे रेकॉर्ड
परराज्यातील विद्यार्थ्यांकडून विद्यापीठ कॅम्पसवर किंवा बाहेर केलेल्या बेकायदेशीर कृतींसंदर्भातील सर्व दस्तऐवज, ऑडिओ/व्हिडीओ क्लिप द्याव्यात.
2. हिंसक किंवा धोकादायक वर्तनाचे पुरावे
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या हिंसक कृत्यांचा संपूर्ण अहवाल, कॅम्पसवर किंवा बाहेर, विद्यापीठाच्या ताब्यातील सर्व स्वरूपातील नोंदीसह सादर करणे आवश्यक.
3. इतर विद्यार्थ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचे पुरावे
गेल्या पाच वर्षांत परराज्यातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची धमकी दिल्याचे पुरावे सादर करावेत.
4. विद्यार्थ्यांचे हक्क बळकावण्यासंदर्भातील रेकॉर्ड
अन्य विद्यार्थ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे हक्क नाकारण्याच्या / बळकावण्याच्या घटनांचे सर्व पुरावे देणे आवश्यक.
5. शिस्तभंग संबंधित संपूर्ण माहिती
गेल्या 5 वर्षांत परराज्यातील विद्यार्थ्यांविरुद्ध झालेल्या सर्व शिस्तभंग कारवायांचे दस्तऐवज.
6. प्रदर्शन-आंदोलनांची व्हिडीओ/ऑडिओ रेकॉर्डिंग
हार्वर्ड कॅम्पसवर परराज्यीय विद्यार्थ्यांच्या सहभागातील कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांची ऑडिओ वा व्हिडिओ रेकॉर्डिंग.
हार्वर्ड विद्यापीठामध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या 800 भारतीय विद्यार्थ्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. F-1 आणि J-1 व्हिसावर आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त दोनच पर्याय आहेत:
SEVP प्रमाणित इतर विद्यापीठात प्रवेश घेणे
व्हिसाची वैधता संपल्यामुळे देश सोडा (डिपोर्टेशन)
ही कारवाई हार्वर्ड आणि ट्रम्प प्रशासनातील 'कॅम्पसवरील अँटीसेमिटिझम' वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन गृह सुरक्षा विभागाने विद्यापीठावर विदेशी विद्यार्थ्यांच्या बाबतीत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा ठपका ठेवला आहे.
अँटीसेमिटिझम (Antisemitism) म्हणजे ज्यू लोकांविरुद्ध असलेला द्वेष, पूर्वग्रह किंवा भेदभाव. हा एक प्रकारचा धार्मिक किंवा जातीय द्वेष असून, याचा इतिहास अतिशय जुना आणि वेदनादायक आहे.
मे महिन्यात, अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) हार्वर्डचे SEVP (Student and Exchange Visitor Program) प्रमाणपत्र रद्द केले, ज्यामुळे विद्यापीठाला परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा अधिकार गमवावा लागला.
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डवर यहूदी विद्यार्थ्यांविरोधात असुरक्षित वातावरण निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
हार्वर्डवर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाने केला आहे.
ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डच्या विविधता, समानता आणि समावेशकतेच्या (DEI) कार्यक्रमांवर टीका केली आहे, ज्यामुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने या सर्व आरोपांना विरोध केला आहे. विद्यापीठाने या निर्णयाला "अवैध" ठरवले असून, परदेशी विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेतील इतर अनेक विद्यापीठांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयांविरोधात आवाज उठवला आहे.