Indian girl attacked in Ireland
लंडन : आयर्लंडमधील वॉटरफोर्ड सिटीमध्ये एका सहा वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी शिवीगाळ करत शारीरिक हल्ला केला.
ही दु:खद घटना सोमवारी सायंकाळी घडली असून, त्यानंतर बुधवारी डब्लिनमध्ये एका भारतीय शेफवर हल्ला करण्यात आला. या घटनांमुळे आयर्लंडमधील भारतीय समुदायात भीती आणि संताप पसरला आहे.
वॉटरफोर्ड शहरातील किलबॅरी भागात सहा वर्षांची भारतीय वंशाची मुलगी आपल्या घरासमोर इतर मित्रमैत्रिणींसोबत खेळत असताना, 12 ते 14 वयोगटातील पाच मुलं आणि आठ वर्षांची एक मुलगी तिच्याजवळ आली.
त्यांनी तिला "डर्टी इंडियन" (घाण भारतीय) म्हणत शिवीगाळ केली आणि "भारतामध्ये परत जा" असे म्हटले. त्यानंतर या टोळीने तिच्या चेहऱ्यावर मारले, सायकलने तिच्या खाजगी भागांवर प्रहार केला, गळा दाबला आणि केस ओढले.
या मुलीची आई गेल्या 8 वर्षांपासून आयर्लंडमध्ये नर्स म्हणून कार्यरत असून नुकतीच आयरिश नागरिकत्व मिळवले आहे. ती मूळची केरळमधील कोट्टायम येथील असून, भारतात बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.
या हल्ल्यामुळे तिच्या मुलीला मानसिक धक्का बसला असून ती आता घराबाहेर खेळायला घाबरते. तिच्या आईने स्थानिक वर्तमानपत्राला सांगितले, “मी आयर्लंडमध्ये प्रामाणिकपणे सेवा देत आहे, नागरिकत्व मिळवले आहे, पण तरीही आमच्यावर वर्णद्वेष होत आहे. मुलंही सुरक्षित नाहीत, ही अतिशय भीतीदायक गोष्ट आहे.”
गर्दाई (आयरिश पोलिस) यांनी या हल्ल्याची दखल घेतली असून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
बुधवारी सकाळी डब्लिनमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली. कोलकात्याहून आलेले लक्ष्मण दास हे ‘अनंतारा द मार्कर डब्लिन’ हॉटेलमध्ये सु-शेफ म्हणून काम करतात.
ते हिल्टन हॉटेलजवळून कामावर जात असताना तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मोबाईल, रोख पैसे आणि इलेक्ट्रिक सायकल लुटली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सेंट व्हिन्सेंट युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनांपूर्वीही आयर्लंडमध्ये भारतीयांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. 19 जुलै, 24 जुलै, 27 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी देखील भारतीय नागरिकांवर हल्ले झाले आहेत. विशेषतः 1 ऑगस्ट रोजी एका भारतीय टॅक्सी ड्रायव्हरवर हल्ला करण्यात आला होता.
या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे आयर्लंडमधील भारतीय समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. गर्दाईकडून अद्याप कोणत्याही घटनेत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनांवर कठोर कारवाई करण्याची आणि भारतीय नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.