पुढारी ऑनलाईन डेस्क : जसा जसा आर्थिक विकास होत आहे, तसा कौटुंबिक आणि सामाजिक रचनेत अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. बऱ्याच प्रगत राष्ट्रात आणि भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्येही हे बदल प्रकर्षाने दिसू लागलेले आहेत. यातच मॉर्गन स्टॅनली या संस्थेचा एक अहवाल समोर आला आहे. यानुसार, जगभरातील महिला पारंपरिक कौटुंबिक जबाबदाऱ्यांपेक्षा करिअरला (Working Women) प्राधान्य देत आहेत. त्यामुळे २०३० पर्यंत ४५ टक्के महिला एकट्या आणि मुलंबाळाशिवाय राहतील, असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. २५ ते ४४ वयोगटातील महिलांबद्दलचा हा अहवाल आहे.
महिलांनी विवाह करणे टाळत आहेत किंवा एकटे राहणे पसंत करत आहेत. पूर्वी विशीतच लग्न करण्याची प्रथा होती; पण महिला आता वैयक्तिक विकास आणि करिअरकडे लक्ष देऊ लागल्या आहेत, त्यामुळे एकटे असणे जास्त "Attractive Status" असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पूर्वी महिला ऐन विशीतच लग्न करत आणि मुलंही लवकर होत असतंे पण आता महिला लवकर मातृत्वाचा विचार करत नाहीत. वर्क लाईफ बॅलन्स, करिअरमधील विकास, मुलांचा खर्च अशी बरीच कारणं असल्याचे यातून दिसते. आता बऱ्याच कुटुंबात महिला या कमावत्या आणि कुटुंबाच्या प्रमुख आर्थिक आधारस्तंभ बनत आहेत. महिला आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी बनल्या आहेत. त्याचबराेबर त्या आता वैयक्तिक आनंद आणि करिअरमधील विकासाकडेही जास्त लक्ष देत आहेत. (Working Women)
एकट्या आणि मुलांशिवाय राहणाऱ्या महिलांचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. अधिकअधिक महिला लग्न टाळू लागल्या किंवा लग्न उशिरा करू लागल्या किंवा अधिकाधिक महिलांनी मूलं होणे टाळले तर महिलांचा आर्थिक प्रभाव जास्त वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. २०३० मध्ये समाजातील लग्न, पालकत्व याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे, असे हा अहवाल सांगतो. मुलांचा सांभाळण होण्याच्या दृष्टीने अधिक प्रागतिक धोरणे आखली जातील, कामाच्या वेळा लवचिक होतील, वेतनात समानता येईल असे तज्ज्ञांना वाटते. जागतिक अर्थव्यवस्थेत महिलांची भूमिका अधिकाधिक महत्त्वाची बनत जाईल. कामाच्या ठिकाणी आणि बाहेरही महिलांचे वाढते महत्त्व आणि महिलांचे स्वातंत्र्य हा या मागचा कळीचा मुद्दा ठरणार आहे. (Working Women)