

लंडन : ‘प्रेम आंधळे असते’ असे म्हणतात. कधी कधी काही जोड्या पाहिल्यावर ही म्हण खरीच असल्याचे पटते! सध्या नॉर्वेच्या राजकुमारीने जो ‘स्वप्नातील राजकुमार’ निवडला आहे तो पाहिल्यावर जगभरातील लोक हेच म्हणत आहेत. याचे कारण म्हणजे या राजकुमारीने तिच्या देशात ज्याला ‘ठग’ म्हणून संबोधले जाते अशा एका अमेरिकन तांत्रिकाशी लग्न केले आहे.
या राजकुमारीने ड्युरेक वेरेटशी आपण शनिवारी (31 ऑगस्ट) ला लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. एका आलिशान हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. राजकुमारी मार्थाचे वय 52 वर्षांचे आहे. घोडेसवारीची आवड असलेली मार्था नॉर्वेजियन राजा हेरॉल्ड आणि राणी सोनजा यांनी थोरली कन्या आहे. तिचा लहान भाऊ ‘क्राऊन प्रिन्स’ हाकोन हा वडिलांच्या गादीचा उत्तराधिकारी आहे. राजकुमारीने एका ‘हॅलो’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मी पुन्हा एकदा लग्न न करण्याचे ठरवले होते. मात्र, 2018 मध्ये माझी ड्युरेकशी भेट झाल्यावर माझे मन बदलले. ड्युरेक वेरेटला नॉर्वेची मीडिया ‘ठग’ म्हणूनच संबोधते. दोघांनी लग्नसोहळ्याच्या स्पेशल कव्हरेजसाठी ‘हॅलो’ मासिकाशी करार केला आहे. एक ओटीटी प्लॅटफॉर्म तिच्यावर एक डॉक्युमेंटरीही बनवणार आहे. त्यासाठीची तयारी वर्षभरापासून सुरू आहे. मार्था 2019 पासून 49 वर्षांच्या वॅरेटशी रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी 2022 मध्ये वाङ्निश्चय केला होता. त्यानंतर तिने आपल्या सर्व शाही जबाबदार्या सोडून दिल्या होत्या. मात्र, वडिलांच्या आग्रहाखातर तिने आपला ‘राजकुमारी’ हा किताब कायम ठेवला. 2017 मध्ये तिने पहिला नवरा एरी बेहन याच्याशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दोन वर्षांनी तिच्या या पतीचे निधन झाले होते. कृष्णवर्णीय तांत्रिक ड्युरेक वेरेट हा स्वतःला ‘आध्यात्मिक उपचारक’ म्हणवून घेतो. आपली ही सहावी पिढी असल्याचेही त्याचे म्हणणे आहे. अमेरिकेतील लॉस एंजिल्समध्ये राहणार्या या तांत्रिकाने ग्वेनेथ पाल्ट्रो, सेल्मा ब्लेयर, नीना डोबरेव आणि रोसारियो डॉसन यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींना मार्गदर्शन केले आहे. मार्थाशी आपला गतजन्मांपासूनचा संबंध असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एकेकाळी मी इजिप्तचा फेरो (राजा) होतो व ती माझी राणी होती, असे त्याने एका मुलाखतीत म्हटले होते!