Kenya Protest
केनियाची राजधानी नैरोबीत झालेली हिंसके निदर्शने. PTI
आंतरराष्ट्रीय

Kenya Protest | केनियात पोलिसांच्या गोळीबारात २३ ठार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केनियात नवीन कर वाढीच्या विधेयकाविरोधात झालेल्या देशव्यापी हिंसक निदर्शनादरम्यान मोठी जीवितहानी झाली आहे. येथील हिंसक निदर्शनांदरम्यान २३ आंदोलकांना पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले आणि बरेच जण जखमी झाले असल्याची पुष्टी नैरोबीमधील वैद्यकीय पथकांनी केली आहे. संसदेबाहेर आणि देशभरात हिंसक निदर्शने झाल्याने मोठी जीवितहानी झाली.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री

केनियात किमान २३ लोक ठार झाले आणि इतर ३० जणांवर गोळ्या लागल्याने उपचार सुरू आहेत, असे केनिया मेडिकल असोसिएशनने बुधवारी सांगितले. दरम्यान, येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानी नैरोबीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली होती.

सरकारने नियोजित कर विधेयक मागे घेतले

दरम्यान, केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी बुधवारी नियोजित करवाढ मागे घेतली. अखेर संसदेवर हल्ला करणाऱ्या निदर्शकांच्या दबावापुढे सरकारने कर विधेयक मागे घेतले. पण एवढ्याने काही निदर्शकांचे समाधान झालेले नाही. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रुटो यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

रुटो काय म्हणाले?

रूटो यांनी जाहीर केले की ते कर वाढीसह वित्त विधेयकावर स्वाक्षरी करणार नाहीत. "मला वित्त विधेयक २०२४ बद्दल काहीही करायचे नाही, याची मी ग्वाही देतो. मी २०२४ च्या वित्त विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही आणि नंतर ते मागे घेतले जाईल," असे ते म्हणाले.

आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

केनियाचे उपाध्यक्ष रिगाथी गचागुआ यांनी तरुणांना आणखी कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरकारला चुकीचा सल्ला दिल्याबद्दल गुप्तचर सेवांना जबाबदार धरले आहे.

संसदेला आग लावली

केनियाच्या संसदेत नियोजित करवाढीसंदर्भात मांडण्यात आलेल्या विधेयकाला तीव्र विरोध झाला. मंगळवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी केनियाच्या संसदेला घेराव घातला. यादरम्यान आंदोलकाच्या एका गटाने संसदेला आग लावली. यावेळी संसदेत आत अडकलेल्या खासदारांना अग्निशमन दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.

SCROLL FOR NEXT