नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमेवर उणे 42 तापमानात 24 तास खडा पहारा देणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. ते आपले निधड्या छातीचे जवान करत असतात. त्यामुळे चीन भारताची एक इंचही जमीन बळकावू शकणार नाही, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. इंडो तिबेट बॉर्डर पोलिसच्या कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोेलत होते.
देवणहळळी येथे आयटीबीपीच्या नवीन निवासी इमारतीचे उद्घाटन, तसेच केंद्रीय गुप्तचर प्रशिक्षण संस्था आणि पोलिस संशोधन व विकास संस्थेची पायाभरणी अमित शहा यांच्या हस्ते झाली. तेव्हा ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी आयटीबीच्या जवानांचे कौतुक करताना चीनलाही सूचक इशारा दिला.
ते म्हणाले की, आपण कल्पनाही करू शकत नाही, इतक्या कठीण आणि विपरीत परिस्थितीत आयटीबीपीचे जवान काम करत असतात. उणे 42 अंश तापमानात सीमांचे रक्षण करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि टोकाचे देशप्रेम हवे असते. ते या जवानांमध्ये आहे. त्यामुळेच देश या जवानांना 'हिमवीर' म्हणून ओळखतो. अरुणाचल प्रदेश असेल, काश्मीर असेल किंवा लडाख असेल, सगळ्या खडतर ठिकाणी हे जवान देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे भारताची एक इंचही जमीन घशाखाली घालण्याची कुणाचीही टाप नाही, असेही शहा म्हणाले.
यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र, आरोग्यमंत्री के. सुधाकर, आयटीबीपीचे महासंचालक अनीश दयाल सिंग, बीपीआरडीचे महासंचालक बालाजी श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
हे ही वाचा :