धर्मशाळा; वृत्तसंस्था : जहाँ मॅटर बडे.. वहॉ विराट खडे..! ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या कौतुकासाठी केलेले हे ट्विट रविवारी पुन्हा एकदा खरे ठरले. विश्वचषकात सलग चार सामने जिंकणार्या न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात भारताचे धुरंधर एका बाजूने बाद होत असताना विराट कोहली पहाडासारखा दुसर्या बाजूला उभा राहिला. नुसता उभाच नाही राहिला तर त्याने राम लक्ष्णमाला खांद्यावर घेवून समुद्रलंघन करणार्या हनुमानाप्रमाणे संघाच्या विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर पेलली. भारताला विश्वचषकातील न्यूझीलंडवर 20 वर्षानंतर पहिला विजय मिळाला. (IND vs NZ)
डॅरेल मिचेलच्या तुफानी शतकानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे न्यूझीलंडला 50 षटकांत 273 धावांपर्यंतच मजल मारता आली. मोहम्मद शमीने आज मिळालेल्या संधीचे सोने केले आणि पाच विकेटस् घेत आपली निवड सार्थ ठरवली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने 130 तर रचिन रवींद्रने 75 धावा केल्या. हे आव्हान भारताने 48 षटकांत 4 विकेटस आणि 12 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46 धावा केल्या.
धर्मशाळाच्या सुंदर व्ह्यू असलेल्या मैदानावर न्यूझीलंडच्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने नेहमीच्या स्टाईलने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी किवी गोलंदाजांच्या वेगाचा वापर करीत टायमिंगवर अचूक फटके मारत धावा गोळा केल्या. पॉवरप्लेमध्ये संघाच्या बिनबाद 63 धावा झाल्या होत्या. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, मिशेल सँटनेर अपयशी ठरल्यानंतर ही जोडी फोडण्यासाठी कर्णधाराने लॉकी फर्ग्युसनच्या हाती चेंडू दिला. त्याने आपले काम चोख बजावले. आधी रोहितचा त्रिफळा उडवून फर्ग्युसनने गिलला थर्डमॅनच्या जाळ्यात अडकवले. रोहितने 46 तर गिलने 26 धावा केल्या.
यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने डावाची सूत्रे हाती घेतली. श्रेयस चांगल्या टचमध्ये आहे असे वाटत होते, परंतु ट्रेंट बोल्टने श्रेयसची कमजोरी ओळखून त्याला बाउन्सर टाकला आणि डिप स्क्वेअर लेगवर मिचेलने त्याचा झेल घेतला. श्रेयसने 33 धावा केल्या. यानंतर जमलेली विराट कोहली आणि के.एल. राहुलची जोडी गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही विजय मिळवून देइल असे वाटत असताना सँटनेरच्या अचूक डिआरएसने राहुलचा (27) बळी घेतला. हार्दिक पंड्याच्या जागी संधी मिळालेला सूर्यकुमार 2 धावांवर धावचित होवून तंबूत परतला.
दरम्यान चेसमास्टर विराट कोहली एका बाजूला आपली ड्युटी शांतपणे बजावत होता. त्याने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून संयमी फलंदाजी केली. एरव्ही सरासरी 40 चेंडूच्या आत अर्धशतक गाठणार्या विराटने यावेळी तब्बल 60 चेंडूत अर्धशतक गाठले. त्याला रवींद्र जडेजा साथ देत होता.
विराट, जडेजाने विजय जवळ आणला, तसे विराटचे शतकही जवळ आले. बांगलादेशविरुध्दच्या सामन्याप्रमाणे शतक आणि विजय यांच्यात रेस लागली. जडेजाने त्याला साथ दिली. शतकाला 5 धावा कमी असताना षटकार ठोकू सामना संपवायचा आणि शतकही गाठायचे असे ठरवून त्याने हेन्रीचा चेंडू फटकावला. परंतु तो सीमारेषा पार न करता ग्लेन फिलिप्सच्या हातात विसावला. भारताच्या विजयाचा गड सर करणारा सिंह मात्र 95 धावांवर बाद झाला. यानंतर जडेजाने वेळ न दबडता विजयी चौकार ठोकला.
तत्पूर्वी, रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने सलामीवीर डेवॉन कॉनवेला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर विल यंगला 17 धावांवर त्रिफळाचीत केले. 19 धावांत दोन बळी गमावल्यानंतर, न्यूझीलंडच्या डावात मोठी भागीदारी झाली. रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल जोडीने दीडशतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. 12 धावांवर रचिन रवींद्रचा झेल जडेजाकडून सुटला. त्याने 87 चेंडूंत 6 चौकार आणि एक षटकार खेचत 75 धावा केल्या. रचिन आणि मिचेल यांनी संघाच्या धावसंख्येत 159 धावांची भर घातली.
रचिन बाद झाल्यावर डॅरेलने एक बाजू लावून धरली आणि संघाला 250 पार मजल मारून दिली. डॅरेल मिचेलने तुफानी फटकेबाजी करत 100 चेंडूंत शतक पूर्ण केले, पण त्याला दुसर्या फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. डॅरेल मिचेलने शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर शेवटच्या षटकांत तो 127 चेंडूंत 130 धावा काढून बाद झाला. त्याने 9 चौकार आणि 5 षटकारांनी खेळी सजवली.
शेवटच्या आठ षटकांत भारतीय गोलंदाजांनी झटपट विकेटस् घेत सामन्यात पुनरागमन केले. गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या भेदक मार्यापुढे न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. शमीने विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिचेल, सँटेनर आणि हेन्री या पाच फलंदाजांना माघारी धाडले. त्याने आपल्या 10 षटकांमध्ये 54 धावा देत 5 बळी मिळवले. कुलदीप यादवने 2, तर बुमराह-सिराजने 1-1 बळी टिपला.
धर्मशाला मे फॉग चल रहा है..!
पावसामुळे सामना थांबल्याचे आपण बर्याचदा पाहिले आहे. याच्याही पुढे जावून दुबईमध्ये झालेला सामना धुळीच्या वादळामुळे थांवबण्यात आला होता. पण धर्मशाळामध्ये एक आगळीच घटना घडली. भारताच्या डावातील सोळावे षटक सुरु असताना मैदानावर धुक्याचे लोट येवू लागले. यामुळे फलंदाजांना चेंडू दिसेनासा झाला. त्यामुळे पंचांनी खेळ थांबवला. सुमारे 15 मिनिटानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. यावर एका नेटकर्याने म्हंटले की, धर्मशाला मे फॉग (धुके) चल रहा है..!
हेही वाचा :