Latest

IND vs PAK Asia Cup 2023 : टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यासाठी BCCI सकारात्मक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो. पाकिस्तानला आशिया कप 2023 चे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली असून बीसीसीआय (BCCI) या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवण्यास तयार असल्याचे समजते आहे. मात्र, अंतिम निर्णय सरकारचा असेल, असेही सांगण्यात येत आहे. जर केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास 2008 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळू शकण्याची दाट शक्यता आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचा 2023 मधील आशिया चषक स्पर्धेसाठीचा पाकिस्तान दौरा हा सध्या निश्चितपणे बीसीसीआयच्या अजेंड्यावर आहे. पण हे प्रकरण निश्चितपणे तत्कालीन केंद्र सरकारच्या मान्यतेच्या अधीन असणार आहे, असे वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तान 2023 च्या उत्तरार्धात 50 षटकांच्या आशिया चषकाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यानंतर भारतात विश्वचषक होणार आहे. एजीएम नोटनुसार, बीसीसीआय पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे, असे वृत्त आहे. (IND vs PAK Asia Cup 2023)
राजकीय मुद्द्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बऱ्याच दिवसांपासून खेळली जात नाही. त्यामुळे हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी सरकारकडून भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. पण याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. आशिया चषकाशिवाय आगामी काळात पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषवणार आहे. (IND vs PAK Asia Cup 2023)

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक 23 ऑक्टोबरला आमनेसामने येणार

सध्या भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. कारण काही महिन्यांतच हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक 2022 मध्ये दोन सामन्यांमध्ये आमनेसामने आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ 2022 च्या T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी या मेगा स्पर्धेत दोन्ही संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता, तर नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला, तर सुपर फोर फेरीत पाकने टीम इंडियावर मात केली. (IND vs PAK Asia Cup 2023)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT