पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Asia Cup : आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले स्टेडियमवर आमनेसामने आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून धडाकेबाज खेळीची अपेक्षा होती. पण दोन्ही धडाकेबाज खेळाडूंनी स्वस्तात विकेट गमावल्या. रोहित (22 चेंडूत 11 धावा) आणि विराटला (7 चेंडूत 4 धावा) पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने क्लिन बोल्ड केले. याचबरोबर एकदिवसीय सामन्यात रोहित आणि विराटला बाद करणारा शाहीन हा पहिला गोलंदाज ठरला आहे.
शाहीनने (Shaheen Afridi) पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर रोहितला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. पाकच्या या डावखु-या गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या बाहेर गुड लेन्थ बॉल टाकला, जो खेळपट्टीवर पडल्यानंतर हलकासा इनस्विंग झाला. अशा परिस्थितीत रोहितने चेंडू रोखण्यासाठी बॅट आणि पॅड पुढे केले. पण चेंडूने बॅट आणि पॅडच्या मधून मार्गक्रमण होत थेट विकेटचा वेध घेतला.
खरेतर बादहोण्यापूर्वी रोहित चांगल्या लयीत खेळत होता पण 4.2 व्या षटकात पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. अर्धा तास उलटल्यानंतर पाऊस थांबला. त्यानंतर खेळ पुन्हा सुरू करण्यात आला. रोहित पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याची लय तुटलेली दिसली आणि याचा फायदा शाहिनने घेतला आणि भारतीय कर्णधाराचा त्रिफळा उडवला. (IND vs PAK Asia Cup)
2021 पासून एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा डावखु-या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना उपयशी ठरला आहे. त्याची डावखु-या गोलंदाजांसमोरील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. धावा : 138, चेंडू : 147, बाद : 6 वेळा, सरासरी: 23, स्ट्राइक रेट: 93.87
शाहीनने कोहलीच्या रूपाने पाकिस्तानला दुसरे यश मिळवून दिले. सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने भारताच्या या स्टार फलंदाजाला बोल्ड केले. शाहिनने (Shaheen Afridi) कोहली चौथ्या स्टंपवर चेंडू टाकला होता. हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फटकावण्याचा कोहलीने प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची बॅटची कड घेऊन थेट स्टंपवर आदळला आणि तो बाद झाला. बाद झाल्यानंतर कोहली खूपच आश्चर्यचकित दिसत होता. अवघ्या 27 धावांत भारताने दोन महत्त्वाचे विकेट गमावल्या होत्या.
धावा : 87
चेंडू : 98
आउट : 4
सरासरी : 21.75
स्ट्राइक रेट : 88.77