पुढारी ऑनलाईन डेस्क
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२,२७० नवे रुग्ण (new covid cases) आढळून आले. तर ३२५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या याआधीच्या दिवशीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी कमी आहे. दिवसभरात ६०,२९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ४ कोटी २० लाख ३७ हजार ५३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोनामुक्ती दर ९८.१२ टक्के इतका आहे. सध्या देशात २ लाख ५३ हजार ७३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १.८ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत देशातील ५ लाख ११ हजार २३० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत.
याआधी बुधवारच्या तुलनेत गुरूवारी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४ हजार ८३७ ने घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी दिवसभरात २५ हजार ९२० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४९२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ६६ हजार २५४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.१२ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन संसर्गदर २.०७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर २.७६ टक्के नोंदवण्यात आला होता.
फेब्रुवारी महिन्यातील कोरोना मृतांचा आकडा १५ हजारांवर गेला आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाने १४,७५२ जणांचा बळी घेतला होता. पण फेब्रुवारी महिन्यात जानेवारीच्या तुलनेत अधिक मृत्यू झाले आहेत. जुलै नंतर सात महिन्यातील हा उच्चांकी आकडा आहे.
देशातील कोरोना लसीकरण अभियानाने वेग घेतला आहे. जानेवारी महिन्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांमध्येच तब्बल दोन कोटी मुलांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी दिली. तर,आतापर्यंत या वयोगटातील ५ कोटी ३१ लाख ९४ हजार ५०७ मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी १ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरूवातीला या वयोगटातील १२ लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. लसीकरणासाठी अजूनही कोव्हिन अँपवर नोंदणी केली जात आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप लक्षात घेता गेल्या महिन्यापासून बूस्टर डोस देण्यास सुरूवात करण्यात आली होती. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस दिला जात आहे. आतापर्यंत १ कोटी ८४ लाख ९० हजार १५२ बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ३९ लाख ९८ हजार ८८१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, ५७ लाख ३५ हजार ३४६ फ्रंटलाईन वर्कर्स आणि ८७ लाख ५५ हजार ९२५ जेष्ठ नागरिकांना आतापर्यंत बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचे शुक्रवारी २,०६८ नवे रुग्ण आढळून आले. सध्या राज्यात २१ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिल्लीत २४ तासांत ६०७ नवे रुग्ण आणि ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या २,७७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, ब्राझिलमध्ये कोरोनाचा वाढता धोका कायम आहे. येथे १ लाख २१ हजार २७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १,१२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जर्मनीत आतापर्यंत १ लाख २१ हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.