नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या वाढून ८८,२८४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १३,०२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५९ टक्के होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
याआधी बुधवारी दिवसभरात १३ हजार ३१३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, या दिवशी १० हजार ९७२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.०३ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.८१ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९६ कोटी ७७ लाख ३३ हजार २१७ डोस देण्यात आले आहेत. यातील काल एका दिवसात १३ लाख ७१ हजार १०७ डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ३.६० कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ३६ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १२ कोटी ३९ लाख ७६ हजार ९२५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
मुंबईत गुरुवारी २,४७९ नवे रुग्ण आढळून आले. तर एकाचा मृत्यू झाला. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत ८३१ ने वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबईतील ही दैनंदिन रुग्णसंख्या २३ जानेवारी नंतरची सर्वाधिक आहे.
नागपुरात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने चढउतार होत आहे. सोमवार २० जून रोजी १७ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरूवारी ९५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ५१ आणि ग्रामीणमधील ४४ रूग्णांचा समावेश आहे. तर बाहेरील जिल्ह्यातील एकाचीही नोंद नसून मृत्यू एकही नाही. सध्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत चढउतार होत आहे. ११ जून रोजी ५५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. १२ जून रोजी ४०, १३ जून रोजी २७ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. या शिवाय १४ जून रोजी ३३, १५ जून रोजी ५०, १७ जून रोजी ६१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.