Latest

‘भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान करणार होता अण्वस्त्र हल्ला’, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांचा गौप्यस्फोट

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याच्या तयारीत होता. त्यामुळे आम्ही देखील तशी तयारी करीत आहोत, असे भारताने आम्हाला कळवले होते. त्यानंतर आपण दोन्ही देशांमध्ये मुत्सद्देगिरीने मध्यस्थी घडवून आणली आणि दोन्ही देशांना एकमेकांवर अण्वस्त्र हल्ल्याची कोणतीही गरज नाही हे पटवून दिले, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी केला आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे, नुकतेच त्यांचे 'नेव्हर गिव्ह एन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून मंगळवारी ते स्टोअर्समध्ये वाचनासाठी उपलब्ध झाले आहे. या पुस्तकात पोम्पीओ यांनी दावा केला आहे की बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची तयारी करत होता. त्यामुळे भारतही तशी तयारी करत आहे, असे भारताकडून कळवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या टीमने रात्रभर हे संकट टाळण्यासाठी काम केले.

पोम्पिओ यांनी पुढे म्हटले आहे की, 27-28 फेब्रुवारी रोजी जेव्हा ते अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी हनोई येथे होते तेव्हा त्यांना भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मध्यरात्री कॉल आला आणि त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या तयारीबाबत सांगितले. तसेच भारतही तशी तयारी करत आहे, असेही त्यांनी सांगितले होते. आपण ती रात्र कधीच विसरणार नाही, असेही पोम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

पोम्पिओ यांनी पुस्तकात लिहिले आहे की, मी हनोई, व्हिएतनाममध्ये होते. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही उत्तर कोरियाशी अण्वस्त्रांवर वाटाघाटी करणे पुरेस नव्हते. भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीरच्या उत्तर सीमेवर अनेक दशकांपासून चाललेल्या वादाच्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना धमक्या देण्यास सुरुवात केली होती.

काश्मीरच्या पुलवामा येथील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने हवाई हल्ला करून त्याचे प्रत्युत्तर दिले. नंतरच्या संघर्षात पाकिस्तानने भारताचे एक विमान पाडले आणि भारतीय पायलटला ताब्यात घेतले होते, असे 'तो' म्हणाला. इथे पोम्पिओ यांनी सुषमा स्वराज यांचा चुकीचा उल्लेख 'तो' असा केला आहे.

पोम्पिओ पुढे लिहितात, सुषमा स्वराज पुढे म्हणाल्या, पाकिस्तान हल्ला करण्यासाठी त्यांची अण्वस्त्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतही तशी तयारी करत आहे. त्यानंतर मी त्यांना काहीही न करण्यास सांगितले आणि गोष्टी सोडवण्यासाठी आम्हाला एक मिनिट द्या, असे म्हणालो.

पोम्पिओ यांनी नंतर हा मुद्दा सोडवण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केले आहे. पोम्पिओ यांनी लिहिले आहे की, स्वराज यांच्याशी बोलणे झाल्यानंतर मी माझ्यासोबत असलेले राजदूत (तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन) बोल्टन यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. मी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यानंतर भारताने मला जे सांगितले ते मी त्यांना सांगितले. त्यावेळी मला बाजवा यांनी ही माहिती खरी नाही, असे कळवले. त्यानंतर भारत-पाकिस्तान एकमेकांना अण्वस्त्र युद्धाची तयारी करत नाही हे पटवून देण्यासाठी नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील आमच्या टीमने काही तास वेळ दिला आणि उल्लेखनीय चांगले काम केले, असे 59 वर्षीय पोम्पिओ यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. दरम्यान, पोम्पीओच्या या दाव्यांवर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT