Latest

ओमायक्रॉनच्या XBB.1.5 सब-व्हेरिएंटची भारतात एंट्री, पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या त्याबद्दल!

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना ओमायक्रॉनच्या (Omicron) XBB.1.5 या सब- व्हेरिएंटचा पहिला रुग्ण देशात आढळून आला आहे. Insacog डेटाने गुजरातमध्ये XBB.1.5 चा पहिला रुग्ण आढळून आल्याचे म्हटले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. XBB.1.5 हा सब- व्हेरिएंट वेगाने कोरोना रुग्णसंख्या वाढीस कारणीभूत ठरणारा आहे. या सब- व्हेरिएंटमुळे अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये रुग्णसंख्येचा उद्रेक झाला असल्याचे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. XBB हा स्वतः ओमायक्रॉनच्या दोन वेगळ्या BA.2 सब- व्हेरिएंटचे रिकॉम्बिनेशन आहे.

अमेरिकेतील एकूण रुग्णसंख्येतील ४० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड रुग्ण Omicron XBB.1.5 मुळे बाधित झाली आहेत, अशी पुष्टी अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या डेटामधून झाली आहे. साथीच्या रोगाचे तज्ज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

एरिक फीगल-डिंग यांच्या मते, नवीन व्हेरिएंट हा BQ आणि XBB पेक्षा जास्त रोगप्रतिकार टाळणारा आणि संसर्ग वाढविणारा आहे. अनेक मॉडेल्स दर्शवतात की XXB15 व्हेरिएंटचा ट्रान्समिशन आर व्हॅल्यू आणि इन्फेक्शन रेट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा अधिक तीव्र आहे.

XBB व्हेरिएंटचा धोका वाढला

"जगासाठी सध्या चिंता ठरत असलेला सर्वात धोकादायक व्हेरिएंट म्हणजे XBB हा आहे," असे अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ऑस्टरहोम यांनी पुढे म्हटले आहे की, अमेरिकेतील १० पैकी सात राज्यांत जेथे रुग्ण आणि रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहेत ती ईशान्येकडील आहेत. तेथे XBB व्हेरिएंट प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. BA.2 व्हेरिएंटचे रिकॉम्बिनंट्स, XBB आणि XBB.1.5 चे प्रमाण ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील एकूण रुग्णांपैकी ४४.१ टक्के एवढे आहे. XBB व्हेरिएंटचे सिंगापूरसह आशियातील काही देशांमध्ये रुग्ण वाढत आहे.

सब-व्हेरिएंटच्या मूळ व्हर्जनमध्ये किरकोळ बदल

महाराष्ट्रातील सर्व्हेलान्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. "आम्ही विषाणूच्या जेनेटिक फूटप्रिंट्सवर लक्ष ठेवून आहोत. राज्यात १०० टक्के जिनोमिक सिक्वेन्सिंग केले जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील थर्मल स्क्रीनिंग आणि २ टक्के रँडम सॅम्पलिंग घेत आहोत. त्यानंतर पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत."

आवटे यांनी पुढे म्हटले आहे की, "महाराष्ट्रात XBB ची २७५ पेक्षा जास्त प्रकरणे आहेत. पण XBB.1.5 हा नवीन प्रकार आहे आणि त्याच्या प्रादुर्भावाबद्दल फारशी काही माहिती नाही. XBB वंशज सूचित करते की सब-व्हेरिएंटच्या मूळ व्हर्जनमध्ये किरकोळ बदल झाला आहे. तरीही त्याचा राज्यात प्रवेश आणि फैलाव रोखण्यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत आहोत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT