पुढारी ऑनलाईन डेस्क : देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारत सरकारने आगामी सणांच्या काळात बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. या बंदीचा परिणाम अमेरिकेतही दिसून येत आहे. सोशल मीडियावर अमेरिकेत राहत असलेले भारतीय लोक तांदूळ खरेदी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तांदूळ बंदीनंतर यूएस स्टोअरमध्ये लांबलचक रांगा आणि अत्यंत गोंधळलेली परिस्थिती दिसून आली. यावरुन आता अमेरिकेत तांदूळ साठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. (Rice buyers in the USA)
भारतीय अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, गैर-बासमती उसना तांदूळ आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल होणार नाही. एकूण निर्यातीत दोन्ही जातींचा वाटा मोठा आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळात गैर-बासमती पांढर्या तांदळाचा वाटा सुमारे 25 टक्के आहे. (Rice buyers in the USA)
आता अधिकाधिक अनिवासी भारतीय आणि आशियाई लोक तांदूळ खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. हे लक्षात घेऊन अनेक अमेरिकन दुकानांनी तांदूळ खरेदीवर काही निर्बंध लादले आहेत. अनेक दुकानांनी 'प्रति घर फक्त १ तांदळाचे पोते' देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच एका कुटुंबाला फक्त एक पोते तांदूळ खरेदी करता येईल. या निर्बंधांपूर्वी, अनेक सुपरमार्केट चेनमध्ये तांदूळ खरेदीसाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत होती.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये लोक शक्य तितक्या तांदळाच्या पिशव्या खरेदी करताना दिसतात. आता 'एक कुटुंब, एक तांदळाचे पोते' असा नियम असल्यामुळे परिस्थिती थोडीशी बदलल्याचे दिसून येत आहे. तांदूळ वितरणात निष्पक्षता आणणे आणि गर्दी कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. भारताने तांदूळ निर्यातीवर अचानक बंदी घातल्याने आगामी काळात धान्याच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. किमती वाढण्याच्या अपेक्षेने लोकांकडून अन्नधान्य साठवून ठेवले जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा