पुढारी ऑनलाईन डेस्क : Bumrah Jansen Fight : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 'कूल' जसप्रीत बुमराह चांगलाच भडकला. तो थेट मुंबई इंडियन्सकडून २०२१ आयपीएल (IPL) खेळणारा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनशी भिडला. दोघांच्या तू तू मैं मैं चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आज (दि. ५) कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काळजीवाहू उपकर्णधार जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सेन यांच्यात बाचाबाची झाली. एकापाठोपाठ एक चेंडू अंगावर आदळल्यानंतर बुमराह अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याची जेन्सनशी बाचाबाची झाली. हे संपूर्ण दृश्य ५४ व्या षटकात पाहायला मिळाले. (Bumrah Jansen Fight)
वास्तविक ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ५४ व्या षटकात घडली. तेव्हा भारताने आठ गडी गमावून २३० हून अधिक धावा केल्या होत्या. यानंतर ५४ व्या षटकात सहा फुटांपेक्षा जास्त लांबीचा मार्को जेन्सन गोलंदाजीसाठी आला. त्याने बुमराहला लागोपाठ चार शॉर्ट चेंडू टाकले, जे बुमराहच्या शरीरावर आदळले. चौथ्या चेंडूवर जेन्सनने बुमराहकडे रोखून पाहिले. आणि तो काहीतरी पुटपुटला. बुमराहही जेन्सनकडे बघू लागला. त्यानंतर दोघेही त्वेषाने एकमेकांच्या दिशेने जाऊ लागले. त्यानंतर बुमराहला पाहून जेन्सन काहीतरी बोलताना दिसला. यावर बुमराह चिडला आणि त्यानेही जेन्सनला प्रत्युत्तर दिले. वाद वाढण्याची शक्यता दिसताच पंचांनी हस्तक्षेप केला. त्यांनी दोघांना वेगळे केले. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आणि टेम्बा बावुमाही बुमराहसोबत संवाद साधताना दिसले. (Bumrah Jansen Fight)
बुमराह-जेन्सनच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर बुमराहने रबाडाच्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र, त्याला सात धावांवर एन्गिडीने बाद केला. त्याचा झेलही जेन्सनने घेतला. बुमराह-जेन्सनमधील संघर्ष पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, आता दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बुमराहपासून दूर राहावे लागेल. या दौऱ्यात बुमराहच्या चेंडूंनी कहर केला आहे.
दरम्यान, भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात २०२ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेने २२९ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आज तिसरा दिवस असून अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. (Bumrah Jansen Fight)