पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma T20 WC : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही यावर सस्पेंस कायम आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर रोहितने एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण गेल्या काही दिवसांपासून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणा-या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच असावा अशी चर्चा रंगली आहे. यासंदर्भात आता स्वत: हिटमॅनने मोठा खुलासा केला आहे.
द. आफ्रिकेत पत्रकार परिषदेदरम्यान रोहितला 2023 च्या विश्वचषकातील पराभवानंतर येथील कसोटी मालिकेकडे तुम्ही कसे पाहता असे विचारले. यावर रोहित म्हणाला, 'आम्ही इथे कधीच जिंकलो नाही आणि नक्कीच ही मालिका जिंकलो तर संघाचा आत्मविश्वास वाढेल. या विजयाने आम्ही विश्वचषकातील पराभव विसरू शकू की नाही हे माहीत नाही. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आता काहीतरी मोठं करून जिंकायचं आहे. संपूर्ण टीमचे हेच लक्ष्य आहे.'
2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळण्यावरून रोहित शर्माने मोठा खुलासा केला. तो म्हणाला, 'क्रिकेटरला प्रत्येक स्पर्धा खेळण्याची तिव्र इच्छा असते. मी पुढच्या वर्षी होणारा टी-20 वर्ल्डकप खेळणार की नाही त्याचे उत्तर सर्वांना लवकरच समजेल.'
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सेमीफायनल गाठली होती. तिथे भारताला इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पराभवानंतर विराट, रोहित, राहुलसारखे खेळाडू टी-20 आंतरराष्ट्रीय खेळलेले नाहीत. आता हे वरिष्ठ खेळाडू 2024 च्या जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळतात की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सध्या हे खेळाडू विश्वचषक 2023 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. (Rohit Sharma T-20 WC)