रायपूर; वृत्तसंस्था : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शनिवारी (दि.21) रायपूर येथे होत आहे. हैदराबाद येथे झालेला पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसर्या सामन्यासह विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे, तर मालिकेतील चुरस कायम राखण्यासाठी विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंड प्रयत्न करेल. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग या स्टेडियमवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. येथील हवामान स्वच्छ व निरभ्र असून सामना मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे. (IND vs NZ 2nd ODI)
बुधवारी झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 349 धावांचा डोंगर उभा केला. मायकल ब्रेसवेलने 144 धावांची खेळी करताना न्यूझीलंडसाठी अखेरच्या षटकापर्यंत खिंड लढवली. भारताने 12 धावांनी हा सामना जिंकला अन् आता दुसर्या वन-डे साठी खेळाडू रायपूर येथे दाखल झाले आहेत. श्रेयस अय्यरचा बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या रजत पाटीदारला याही सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. (IND vs NZ 2nd ODI)
भारताने पहिल्या सामन्यात साडेतीनशे धावा करूनही त्यांना या धावांचा बचाव करताना चांगलीच दमछाक झाली. पहिल्या सहा विकेट लवकर मिळूनही तेथून पुढे ब्रेसवेल आणि सँटनर यांनी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. यात भारतीय गोलंदाजीची मर्यादा उघड झाली. रायपूरच्या मैदानात त्यांना या गोष्टी टाळाव्या लागतील.
रोहितवर बंदीची टांगती तलवार
शनिवारी होणार्या दुसर्या लढतीपूर्वी आयसीसीने भारताला दणका दिला आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे आयसीसीने संघाच्या मॅच फीमधील 60 टक्के रक्कम दंड म्हणून कापली आहे. आयसीसीच्या मॅच रेफरीच्या एलिट पॅनलचे प्रमुख जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. आयसीसीच्या नियम क्रमांक 2.22 नुसार दिलेल्या वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रत्येक षटकामागे खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्या मॅच फीमधील 20 टक्के रक्कम कापली जाते. त्यानुसार भारतीय संघाला 60 टक्के मॅच फीचा दंड सुनावण्यात आला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने हा निर्णय मान्य केला आहे. दुसर्या सामन्यातही षटकांची गती संथ राहिल्यास कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई होऊ शकते.
संघ यातून निवडणार:
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, एच शिपले.
हेही वाचा;