लंडन ; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड (Ind Vs Eng 2nd ODI) यांच्यातील दुसर्या वन-डे सामन्यात 100 धावांनी विजय मिळवून इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यजुवेंद्र चहल याने घेतलेल्या चार विकेटस्च्या जोरावर भारताने इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी पुन्हा शानदार कामगिरी करत इंग्लंडला 246 धावांमध्ये गुंडाळले. पण हे आव्हान भारतीय फलंदाजांना पेलवले नाही. त्यांचा डाव 146 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडच्या रेसी टॉप्ले याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
भारताने पहिल्या सामन्यात नाबाद विजय मिळवला होता; परंतु क्रिकेट पंढरी लॉर्डस्वर झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. कर्णधार रोहित शर्मा (0), शिखर धवन (9), ऋषभ पंत (0), विराट कोहली (16) या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. मधल्या फळीतील सूर्यकुमार यादव (27), हार्दिक पंड्या (29), रवींद्र जडेजा (29), मोहम्मद शमी (23) यांनी थोडेफार प्रयत्न केले; परंतु एकही मोठी भागीदारी झाली नसल्याने भारताचा डाव 146 धावांत संपला. इंग्लंडच्या रेसी टॉप्ले याने 24 धावांत 6 विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध खेळ केला. हार्दिक पंड्याने त्याच्या पहिल्याच षटकात रॉयला (23) बाद केले. 15व्या षटकात यजुवेंद्र चहलने 38 धावा करणार्या बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. पुढच्या षटकात चहलने इंग्लंडच्या जो रूटला (11) पायचित केले. मो. शमीने इंग्लंडला चौथा धक्का देताना जोस बटलरचा (4) त्रिफळा उडवला. (Ind Vs Eng 2nd ODI)
बेन स्टोक्स 21 धावांवर एलबीडब्ल्यू झाला. मोईन अली व लियाम लिव्हिंगस्टोन यांनी सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोन हार्दिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लिव्हिंगस्टोन 2 चौकार व 2 षटकारांसह 33 धावा करून माघारी परतला. मोईन अलीने आज दमदार खेळ केला. त्याने 64 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा करताना संघाला दोनशेपार पोहोचवले. पण, चहलने त्याची विकेट घेतली.
* चहलने 47 धावांत 4 विकेटस् घेतल्या. लॉर्डस्वरील वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्याने 1983 साली नोंदवला गेलेला विक्रम मोडला. मोहिंदर अमरनाथ यांनी 1983 मध्ये 12 धावांत 3 विकेटस् घेतल्या होत्या आणि ती लॉर्डस्वरील भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. त्यानंतर आशिष नेहराने 2004 मध्ये (3/26) व हरभजन सिंगने 2004 मध्ये (3/28) तीन विकेटस् घेतल्या होत्या.
* लॉर्डस्वरील दुसरा वन-डे सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हेही उपस्थित होते. सचिन व गांगुली यांना सोबत पाहून स्टेडियमवर जल्लोष झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना हेही लॉर्डस्वर दिसले.