पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया (Team India) छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून (दि. 9) सुरू होत आहे. पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत पेच निर्माण झाला आहे. श्रेयस अय्यर वगळता संघात निवडलेले जवळपास सर्वच खेळाडू तंदुरुस्त आहेत. अशा स्थितीत संघातील सहा खेळाडूंचे स्थान निश्चित मानले जात आहे. तर उर्वरित पाच खेळाडूंबाबत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे चर्चा करूनच सामन्यापूर्वी अंतिम निर्णय जाहीर करतील.
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत होता, मात्र त्याला टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. पण आता तो पुन्हा तयार झाला आहे. ज्या सहा खेळाडूंचे स्थान निश्चित झाले आहे त्यात पहिले नाव कर्णधार रोहित शर्माचे आहे. पण त्याच्या जोडीला सलामीला कोण येणार हे अद्याप ठरलेले नाही.
यात केएल राहुल (KL Rahul) आणि शुभमन गिल (Shubaman Gill) यांच्या नावावर सामन्यापूर्वीच शिक्कामोर्तब होईल. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा खेळण्याची खात्री आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर येईल, यात शंका नाही.
यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विन (R Ashwin) हेही अष्टपैलू म्हणून खेळताना दिसतील. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान जवळपास निश्चित झाले आहे. या सहा खेळाडूंनंतर उर्वरीत पाच खेळाडू कोण असतील हे अजूनही गूढच आहे.
केएल राहुलचे खेळणे जवळपास निश्चित असले तरी तो टीम इंडियाचा उपकर्णधारही आहे. पण त्याची फलंदाजी कशी असेल, हे अद्याप कळलेले नाही.
शुभमन गिल आणि केएल राहुलमधून केवळ एका खेळाडूला सलामीची संधी मिळेल. दोन्ही खेळाडू खेळले तर एकाला मधल्या फळीत खेळावे लागेल. टीम इंडिया तीन फिरकीपटूंसोबत खेळणार असल्याचे केएल राहुलने आधीच स्पष्ट केले आहे.
अश्विन आणि जडेजा खेळणार हे निश्चित असले तरी उर्वरित दोन फिरकीपटूंपैकी एकालाच संधी मिळेल. यात कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. यानंतर यष्टिरक्षक कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापन इशान किशन आणि केएस भरत यांच्यापैकी एकाला पसंती देईल.
इशानने टीम इंडियाच्या टी-20 आणि वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. पण तो अजूनही कसोटी खेळलेला नाही. भरतही कसोटीत प्रदार्पण करण्यापासून अजून वंचित राहिला आहे. मात्र, यात इशानचे पारडे जड आहे. रोहित शर्मा त्याला संधी देईल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सूर्यकुमार यादवलाही (Suryakumar Yadav) पदार्पण करण्याची संधी चालून आली आहे. मात्र त्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 9 वाजता जेव्हा कर्णधार रोहित शर्मा टॉससाठी मैदानात उतरेल आणि प्लेइंग इलेव्हनची घोषणा करेल तेव्हाच सर्व काही उघड होईल.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, उमेश यादव.