पुढारी ऑनलाईन: गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीने रेडिओ आणि एफएमला नवीन आकार दिला आहे. इंटरनेटमुळे रेडिओ मागासला नसून, ऑनलाईन एफएम आणि पॉडकास्टच्या माध्यमातून नव्याने समोर आला आहे. डिजिटल इंडियाने रेडिओला नवीन श्रोते आणि नवीन विचार दिला आहे, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. देशातील 18 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 85 जिल्ह्यातील 91 एफएम रेडिओ ट्रान्समीटरचे आज (दि.28) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना पीएम मोदी म्हणाले, आज देशभरातील 91 एफएम रेडिओचे उद्घाटन म्हणजे ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा विस्तार हे ऑल इंडिया एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. 85 जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले 91 एफएम रेडिओ ट्रान्समीटर हे २ कोटी जनतेला ही भेटवस्तूच असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, आजची पिढी रेडिओची भावनिक प्रेक्षक आहे. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की प्रेक्षक असण्यासोबतच मी रेडिओवरून मन की बात हा कार्यक्रम होस्टही करत आहे. मी लवकरच 'मन की बात'चा 100 वा भाग होस्ट करणार आहे. रेडिओशिवाय इतर कोणत्याही माध्यमाद्वारे देशभरातील लोकांशी सखोल संबंध जोडणे शक्य झाले नसते, असे म्हणत पीएम मोदींनी रेडिओचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान सर्वांना सुलभ आणि परवडणारे बनवणे हे यासाठी एक उत्तम माध्यम आहे. तसेच आज भारतातील प्रत्येक गावात ज्या पद्धतीने ऑप्टिकल फायबर पोहोचले आहे. मोबाईल आणि डेटाची किंमत इतकी कमी झाली आहे की, त्यामुळे माहिती मिळवणे अधिक सोपे झाले आहे, असे देखील पीएम मोदी यांनी याप्रसंगी स्पष्ट केले आहे.
ज्या ठिकाणी एफएम रेडिओ केंद्रे स्थापन केली जाणार आहे, त्यात बिहार, झारखंड, ओडिशा, प. बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये तसेच लडाख व अंदमान – निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
या एफएम रेडिओमुळे मागास महत्त्वाकांक्षी तसेच सीमाभागातील जिल्ह्यातील जनतेशी संपर्क वाढण्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. सरकारच्या या मोहिमेमुळे दोन कोटी लोकांपर्यंत रेडिओ सेवा पोहोचणार आहे. याशिवाय 35 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आकाशवाणीचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे प्रसारण येत्या रविवारी(दि.३०) होत आहे. त्याच्या दोन दिवस आधी हा विस्तार होणार आहे, हे विशेष आहे.